लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आरोपी मनोहर कुलकर्णीने हिंदूंचे दोन प्रकार स्पष्ट केले. मनूला मानणारे आणि ज्ञानेश्वर-तुकारामाला मानणारे. त्याच्याप्रमाणेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मनूलाच मानतात. म्हणूनच सापाचे निमित्त करून त्यांनी विठ्ठलदर्शन टाळले. हे मनुवादी सरकार उलथविण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे वंचित बहुजन आघाडीच, असे सांगत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजनांना सत्तेची किल्ली ताब्यात घेण्याचे आवाहन केले.वंचित बहुजन आघाडीची ‘संवाद यात्रा’ शनिवारी यवतमाळात पोहोचली. त्यावेळी येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे. मात्र मागील सरकारने ते केले नाही. सध्याच्या सरकारचीही ती इच्छा नाही. कारण त्यांना ओबीसींचे भले करायचेच नाही. आरएसएस आणि काँग्रेसने कधीही वंचित समाजाला उमेदवारी दिली नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे येत्या निवडणुकीत किमान ५० जागांवर लहान ओबीसींमधील (अतिपिछडा ओबीसी) न्हावी, शिंपी, सोनार अशांना उमेदवारी दिली जाईल. सध्या राजकारणात जातींच्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. हा चक्रव्यूह भेदण्यासाठी वंचित बहुजनांच्या आघाडीचे अस्त्र तयार झाले आहे.प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार असल्याने आपण राजकीयदृष्ट्या समान आहोत. मात्र लोकशाहीचे सामाजीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या जातीचा उमेदवार पाहून मत देऊ नका. तर वंचितांसाठी काम करणारा उमेदवार निवडा, असे आवाहन करताना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. आपल्या पत्नीशी त्यांनी जसा व्यवहार केला, तसाच व्यवहार ते आता जनतेशी करीत आहे. म्हणूनच अमेरिकेत एखादा उमेदवार आपल्या कुटुंबात कसा वागतो, ते पाहूनच मतदान केले जाते. भारतात मात्र जातीचा विचार करून उमेदवार निवडला जातो आणि तो सत्तेत बसल्यावर आपण पश्चात्ताप करतो. त्यामुळे येत्या लोकसभा, विधानसभेत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना टाळून वंचित बहुजन आघाडीलाच मत द्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोरे (गोबरे) होते. माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने, माजी आमदार हरिदास भदे, विजयराव मोरे, युसूफ पुंजवानी, गुणवंत देवपारे, डॉ. दिलीप घावडे, भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, कैलास पवार, लटारी मडावी, भास्कर पंडागळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. मेळाव्याला सर्व तालुक्यातून नागरिकांनी हजेरी लावली होती.
बहुजनांनो, सत्तेची किल्ली ताब्यात घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 10:32 PM
आरोपी मनोहर कुलकर्णीने हिंदूंचे दोन प्रकार स्पष्ट केले. मनूला मानणारे आणि ज्ञानेश्वर-तुकारामाला मानणारे. त्याच्याप्रमाणेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मनूलाच मानतात. म्हणूनच सापाचे निमित्त करून त्यांनी विठ्ठलदर्शन टाळले. हे मनुवादी सरकार उलथविण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजे वंचित बहुजन आघाडीच, असे सांगत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजनांना सत्तेची किल्ली ताब्यात घेण्याचे आवाहन केले.
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन आघाडीची यवतमाळात संवाद यात्रा