उदय पुंडे
(यवतमाळ):ढाणकी - समाजामध्ये आपण अनेक लोक पाहतो जे कोणत्याही ध्येयाविना किडा मुंगीसारखे आपले आयुष्य जगत असतात. मात्र, काही असेही लोक असतात कि लोकांच्या सेवेसाठी आपल्या जीवनातील सर्व गोष्टींचा त्याग करतात. असेच एक उदाहरणं म्हणजे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील ढानकी गावाची लेक प्रीती दादाराव थुल. त्या पेशाने वकील आहेत. प्रीती ताई यांचा विवाह बीड जिल्हातील गेवराई येथील संतोष गर्जे यांच्यासोबत झाला. लग्नानंतर सुखी संसाराचे स्वप्न अनेक मुली पाहत असतात. मात्र, प्रीती यांना आपल्या पुढील आयुष्याची कल्पना होती, कारण त्यांनी हा मार्ग स्वतः निवडला होता. आपल्या बहिणीच्या मृत्युनंतर तिच्या मुलीला सांभाळून तिच्यासोबत इतर अनाथ उपेक्षित मुलांना संभाळणाऱ्या संतोषसोबत त्यांची गाठ बांधली गेली होती.
गेवराई येथे संतोष गर्जे यांनी सन 2006 मध्ये सहारा अनाथालय बालग्रामची स्थापना केली. गेवराई शहरापासून 3 किमी अंतरावर खंडोबाच्या माळा निसर्ग रम्य ठिकाणी हा अनाथआश्रम स्थापन केला आहे. लहान मुलांसाठी वेगळी, मोठ्या मुला मुलींसाठी वेगळी अशी त्यांना राहण्याची व्यवस्था आहे. 3 एकरच्या क्षेत्रात पसरलेल्या या प्रकल्पातच भाजीपालासारखे उत्पन्न घेतले जाते. त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचासुद्धा आहे. बालग्रामचा परिसर अतिशय स्वच्छ व नीटनेटका असून तेथील मुलांना प्रीतीताई व संतोष गर्जे स्वतः आपल्या मुलांप्रमाणे जपतात. त्यांच्यावर संस्कार करतात. तेथील कोणत्याही मुलाच्या चेहऱ्यावर अनाथपणाचे भाव दिसत नाहीत. माझे संतोष बाबा आणि प्रीती आई अश्याच नावाने ते त्यांना हाक मारतात. इतके दिवस पत्राच्या शेडमध्ये असणाऱ्या आश्रम 23 फेब्रुवारीला नुकत्याच बांधलेल्या प्रशस्त अशा इमारतीत हलवला आहे. अतिशय चांगली अशी मुलांना जेवण्याची आणि राहण्याची व्यवस्था प्रीती ताई व संतोष यांनी केली आहे.