यवतमाळ : नाशिक येथील आरोग्य विद्यापीठातर्फे राज्यभर बीएएमएसच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. मंगळवारी बालरोग विषयाचा पेपर होता. हा पेपर फुटल्याची चर्चा झाल्याने येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात खळबळ उडाली होती. या प्रकरणाची विद्यापीठाच्या सूचनेवरून तत्काळ तपासणी करण्यात आली.
बीएएमएस तृतीय वर्षाचा मंगळवारी बालरोग या विषयाचा दुपारी २.३० ते ५.३०पर्यंत पेपर होता. तत्पूर्वीच हा पेपर आयुर्वेद महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याच्या व्हॉटस्ॲपवर आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर लगेच त्या विद्यार्थ्याने थेट नाशिक विद्यापीठात भ्रमणध्वनी केला. त्याने संबंधितांना पेपर फुटल्यामुळे आपल्यासारख्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होते, असे तेथील संबंधितांना सांगितले. त्या विद्यार्थ्याच्या फोननंतर नाशिकच्या विद्यापीठात खळबळ उडाली. विद्यापीठाने तत्काळ चौकशीचे निर्देश दिले.
आरोग्य विद्यापीठाच्या सूचनेवरून येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. बत्रा यांच्या नेतृत्त्वातील एक चमू मंगळवारी आयुर्वेद महाविद्यालयात धडकली. या चमूने तेथील स्ट्राँग रूमची तपासणी केली. यावेळी परीक्षा नियंत्रक डॉ. मनोज येरावार उपस्थित होते. विशेष म्हणजे परीक्षा नियंत्रण करण्यासाठी महाविद्यालयाचीही एक समिती असते. या समितीत चंद्रपूरचे निरीक्षक आहेत. ते येथे दाखल झाल्यानंतर दोन पंचांच्या साक्षीने स्ट्राँग रूमची तपासणी झाली. मात्र, त्यात कुठेही काहीच गडबड आढळली नसल्याचे डॉ. येरावार यांनी सांगितले.
डाॅ. बत्रा यांच्या नेतृत्त्वातील समितीने महाविद्यालयाची तपासणी केली. सीसीटीव्ही फुटेज बघितले. त्या विद्यार्थ्याचा शोध घेतला. पेपर संपल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. त्याचा पेपर एका वेगळ्या पॉकीटमध्ये ठेवण्यात आला. दरम्यान, या प्रकाराने संपूर्ण आरोग्य वर्तुळातच खळबळ उडाली होती.
विद्यापीठ चौकशी समिती नेमणार
या कथित पेपर फुटीच्या चौकशीसाठी नाशिकचे आरोग्य विद्यापीठ चौकशी समिती नेमू शकते, अशी माहिती महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक डॉ. मनोज येरावार यांनी दिली. त्यांनी त्या विद्यार्थ्याचा ताब्यात घेतलेला मोबाईल बुधवारी पेपर घेण्यासाठी येणाऱ्या चमूकडे सुपूर्द करणार असल्याचे स्पष्ट केले. त्या विद्यार्थ्याला नेमका कोणता पेपर, कोठून आला, याचे तार आता जुळविले जाणार आहे. मात्र, त्या विद्यार्थ्याने प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, याच भावनेने थेट विद्यापीठाला फोन करून माहिती दिल्याचे सांगितले जाते.
डॉ. बत्रा यांच्या नेतृत्त्वातील समितीने महाविद्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मात्र, महाविद्यालयात कोणताही गैरप्रकार आढळला नाही. त्याबाबत डॉ. बत्रा यांनी विद्यापीठाला अवगत केले.
- डॉ. राजीव मुंदाने, प्राचार्य, आयुर्वेद महाविद्यालय, यवतमाळ