कॅशलेस व्यवहारांसाठी असाही फंडा : ग्राहक म्हणतात, मोदीजी १५ लाख नकोच, किमान आमचे बँक खात्यातील हक्काचे पैसे तरी आम्हाला द्या लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : नागरिकांनी कॅशलेस व्हावे, रोखीने व्यवहार करू नये म्हणून केंद्र सरकारने नोटाबंदी केली. मात्र त्यानंतरही नागरिकांचा कॅशलेसकडे कल वाढत नसल्याचे पाहून चक्क कृत्रिम चलन तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना बँका, एटीएममधून पैसे मिळेनासे झाले असून जनतेची दाणादाण उडाली आहे. नोटाबंदीच्या काळात नागरिकांनी रोकड मिळविण्यासाठी जणू युद्धजन्य परिस्थितीचा सामना केला. त्यापेक्षाही गंभीर स्थिती सध्या बँका व एटीएममध्ये पहायला मिळत आहे. जिल्हा मुख्यालयी असलेल्या बँकांच्या मुख्य शाखेतसुद्धा ग्राहकाला पूर्णपैसे दिले जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. यावरून ग्रामीण भागात काय अवस्था असेल याची कल्पना येते. एटीएमवरील अवस्था तर आणखीनच बिकट आहे. यवतमाळ सारख्या शहरी भागातील एखाद दोन एटीएममध्ये पैसे असतात. तेथेही मोठ्या रांगा लागत असल्याने काही वेळातच पैसे संपतात. त्यामुळे नागरिकांचे व्यवहार कोलमडले आहे. ऐन पगाराच्या दिवसात १ ते १५ तारखेपर्यंत एटीएम रिकामे राहतात. त्यामुळे व्यवहार कसे करावे, असा प्रश्न निर्माण होतो. आॅनलाईन व्यवहारावर जोर असला तरी सामान्य नागरिकांना ते अद्यापही सुरक्षित वाटत नाही. शिवाय ते सुरक्षित असल्याचे सांगण्याची, त्याबाबत जनजागृती करण्याची तसदी बँका घेत नाही. बँका व एटीएममध्ये सरकारच्या सूचनेवरूनच रिझर्व्ह बँकेने कृत्रिम टंचाई निर्माण केल्याची माहिती बँकींग क्षेत्रातून पुढे आली आहे. जाणीवपूर्वक बँका व एटीएमला कमी चलन पुरवठा केला जात आहे. नागरिकांनी कॅशलेस व्हावे, आॅनलाईन व्यवहार करावे, यासाठी ही शक्कल लढविण्यात आली आहे. मात्र ही शक्कल मोदी सरकार आणि भाजपाच्या अंगलट येण्याची चिन्हे आहे, कारण या प्रकारामुळे जनतेत मोदी सरकार व भारतीय जनता पक्षाविरोधात तीव्र असंतोष निर्माण होत आहे. एटीएममधून रिकाम्या हाताने बाहेर निघणारा प्रत्येक ग्राहक ‘मोदीला आणखी निवडून देणारच का ?’ असा सवाल विचारुन २०१९ मधील फेरबदलाचे संकेत देतो आहे. मोदींच्या घोषणेचा फसवणुकीसाठी वापर काळा पैसा भारतात आणल्यानंतर नागरिकांच्या जनधन खात्यात १५ लाख रुपये जमा केले जातील, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखविले होते. मात्र त्यांच्या या स्वप्न वजा घोषणेचा वापर चक्क नागरिकांच्या आॅनलाईन फसवणुकीसाठी केला जात आहे. याचा प्रत्यय गेल्याच आठवड्यात येथील नागपूर रोड स्थित अलहबीबनगरातील नागरिकाला आला. तुमच्या खात्यात १५ लाख जमा करायचे आहे, असे सांगून त्याचा एटीएम कार्ड नंबर व पासवर्ड मागण्यात आला. त्याने नंतर शेजाऱ्याचा एटीएम नंबर दिल्याने त्यातील ८२ हजार रुपये क्षणात वळते केले गेले. याच कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये मारहाण होऊन प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. चेक कुणी घेईना ! सरकार कॅशलेसवर जोर देत असले तरी बाजारात कुणीही नवख्या ग्राहकाचा चेक स्वीकारत नाही. हा चेक स्वीकारण्यासाठी व्यापारी कुणी तरी मध्यस्थ मागतात. एवढेच नव्हे तर लहान बँका-पतसंस्थासुद्धा इलेक्ट्रीक बिल भरणाऱ्या ग्राहकांकडून चेक स्वीकारत नाही. चेक देऊ पाहणाऱ्या ग्राहकाला पाच टक्के वॅटची भीती दाखविली जाते.
बँका, एटीएममध्ये कृत्रिम चलन तुटवडा, ग्राहकांची कुचंबणा
By admin | Published: May 19, 2017 1:46 AM