दिग्रस : तीर्थक्षेत्र पर्यटन विकासांतर्गत पोहरादेवी येथे वन उद्यानाचे भूमिपूजन महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ना. रणजित पाटील, खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी आदींच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी आमदार अनंतकुमार पाटील, वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, पोहरादेवीचे सरपंच विजय पाटील, एस.डी. राठोड, डॉ. श्याम जाधव, महादेव सुपारे, सुनील महाराज आदी प्रामुख्याने उपस्थित होते. ना. संजय राठोड म्हणाले, तीर्थक्षेत्र विकासांतर्गत पोहरादेवी विकास आराखड्यास मुख्यमंत्र्यांकडून प्रशासकीय मान्यता मिळाली. हा प्रस्तावित आराखडा १३१ कोटी रुपयांचा आहे. या आराखड्यानुसार राज्य शासनाने पाच कोटी व वनविभागाने सहा कोटी असा ११ कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात दिला आहे. वनउद्यानाची निर्मिती करताना कडूनिंबाच्या झाडांना प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले. स्वच्छ भारत संकल्पनेवर आधारित ‘स्वच्छ पोहरादेवी, सुंदर पोहरादेवी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. जनजागृती समिती यवतमाळचे राजू निवल यांच्या नेतृत्त्वात समितीचे अनेक कार्यकर्ते या अभियानात सहभागी झाले आहेत. या कार्यकर्त्यांशीही ना. राठोड यांनी संवाद साधला. पोहरादेवी येथे रामनवमीनिमित्त देशभरातील भाविक दाखल होतात. त्यांची गैरसोय होवू नये यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. ‘स्वच्छ पोहरादेवी, सुंदर पोहरादेवी’ हा त्यातीलच एक भाग आहे. वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री ना. रणजित पाटील म्हणाले, सांघिक प्रयत्नातून पोहरादेवीचा विकास केला जाईल. हे क्षेत्र जलसंधारण व मृदसंधारण केंद्रसुद्धा व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.खासदार भावना गवळी, आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील आदींनी समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वनपरिक्षेत्र अधिकारी प्र.न. लोणकर यांनी केले. (प्रतिनिधी)
पोहरादेवी येथे वनोद्यानाचे भूमिपूजन
By admin | Published: April 17, 2016 2:29 AM