यवतमाळ : भक्तांना गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा होती. तर शेतकऱ्यांना पावसाची. गुरुवारी गणराय आले ते पावसाचा प्रसाद घेऊनच. त्यामुळे शेतशिवार सुखावले. सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला तर उधाणच चढले. भरपावसात नाचत लाडक्या गणरायाला ‘रिसिव्ह’ करण्यासाठी वाजत-गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. मूर्ती विक्रेत्यांची मात्र पावसामुळे तारांबळ उडाली. गणेशस्थापनेच्या दिवशी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला. पोस्टल ग्राऊंड, दत्त चौक, आर्णी रोड आदी परिसरात गणेशमूर्ती घेऊन बसलेल्या विक्रेत्यांना सर्व मूर्ती झाकून ठेववाव्या लागल्या. घरगुती गणेश स्थापना करणाऱ्या भाविकांना अक्षरश: छत्रीतून गणरायांना न्यावे लागले. तर बेल, फुल, हार, दुर्वा असे पूजेचे साहित्य विकणाऱ्यांना ओलेचिंब व्हावे लागले. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मात्र पावसातले गणेश आगमन ‘सेलिब्रेट’ केले. चौका-चौकात तासन्तास मिरवणुका रेंगाळल्या. पावसाने भिजलेल्या रस्त्यांवर कार्यकर्त्यांची पावले थिरकत होती. पावसामुळे मूर्तीचा रंग खराब होऊ नये, याची मूर्तिकारांच्या चेहऱ्यावर काळजी झळकत होती. पण भक्तांच्या चर्येवर पावसाच्या आनंदाचे तुषार थयथयत होते. पावसातला हा गणेशोत्सव शहरवासीयांचे लक्ष वेधून गेला. तर कास्तकारांनाही दिलासा देऊन गेला. (स्थानिक प्रतिनिधी)
बाप्पा अन् पाऊस
By admin | Published: September 18, 2015 2:18 AM