लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कपाशी व सोयाबीनचे बहुतांश पीक घेतले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या पिकांमधून हाती काहीही येत नसल्याने पुढील हंगामापासून सिंचन सुविधा असलेल्या ६० टक्के शेतकऱ्यांनी या पिकांकडे पाठ फिरविण्याची मानसिकता तयार केली आहे. त्याऐवजी हे शेतकरी पर्यायी पिकांकडे वळणार आहेत. उर्वरित कोरडवाहू शेतकरीसुद्धा महागडे विकतचे बियाणे घेण्याऐवजी घरचेच सोयाबीन बियाणे पेरण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून कपाशी, सोयाबीन ही पिके शेतकऱ्यांना दगा देत आहेत, कधी निसर्गामुळे, कधी बोंडअळीमुळे, तर कधी पुरेसा भाव मिळत नसल्याने. यावर्षी तर सोयाबीन पूर्णत: शेतकऱ्यांच्या हातून निघून गेले. कित्येक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर लावून शेतातील सोयाबीन उपटून फेकले. अशीच काहीशी अवस्था कपाशीची झाली. बोंडअळीमुळे कपाशीचे पीक होत्याचे नव्हते झाले. एकरी १० ते १२ क्विंटलची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात चार ते पाच क्विंटलच कापूस शेतकऱ्यांच्या हाती आला. निघालेला कापूस वेचायलाही परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतातील उभी पऱ्हाटी उपटून फेकली. निसर्गाचा लहरीपणाही त्याला कारणीभूत ठरला. लागवड खर्च अधिक आणि उत्पन्न कमी, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. वर्षभर घाम गाळून हाती काहीच येत नसल्याने व कर्जाचा डोंगर कायम राहात असल्याने उपजीविका चालवायची कशी, या विवंचनेत शेतकरी आला आहे. त्यामुळेच सिंचन सुविधा असलेल्या किंवा शेजारील शेतकऱ्यांच्या मदतीने ती उपलब्ध करू शकणाऱ्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२१ मध्ये कपाशी व सोयाबीनचे पीक घ्यायचेच नाही, असा निर्धार केला आहे. त्याऐवजी या शेतकऱ्यांनी पाण्याच्या भरवशावर हळद, कांदा, आले, लसूण, भाजीपाला, सूर्यफूल, मका, तूर, उडीद, मूग या पिकांकडे वळण्याची तयारी चालविली आहे. पूर्वी हळद विक्रीसाठी शेतकऱ्यांना मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जावे लागत होते. मात्र, आता या हळदीची खरेदी यवतमाळातच होत असून, प्रतिक्विंटल साडेचार हजारांपर्यंत भावही मिळतो आहे. यंदाच्या खरीप हंगामात बहुतांश शेतकऱ्यांनी पीक पॅटर्न बदलविण्याची भूमिका घेतली आहे.
कोरडवाहू शेतकऱ्यांना विकतचे महागडे सोयाबीन बियाणे घेऊन पेरावे लागते. यावर्षी तर सोयाबीनच न निघाल्याने या हंगामात हे बियाणे महाग होण्याची, काळाबाजार होण्याची, जादा दराने घ्यावे लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाबीजनेसुद्धा हात वर केले असून, खरीप हंगामात बियाणे पुरेशा प्रमाणात देऊ शकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन बियाणे वापरा, असे आवाहन केले आहे. भविष्यातील अडचणी ओळखून व कृषी विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत घाटंजी, पांढरकवडा, पाटणबोरी, पुसद या भागातील अनेक शेतकऱ्यांनी बियाण्यांची सोय व्हावी म्हणून दीड ते दोन एकरांत सध्या सोयाबीन पेरले आहे. त्यासाठी पाण्याची व्यवस्थाही केली आहे. एका एकरात तीन ते चार क्विंटल सोयाबीन पिकत असल्याने या माध्यमातून खरीप हंगामासाठी किमान पाच एकराची सोयाबीन बियाण्यांची सोय शेतकरी स्वत:च स्वत:साठी करतो आहे. कित्येक शेतकऱ्यांनी चणाच्या पिकात सोयाबीन पेरल्याची उदाहरणे आहेत. ओलिताची सोय असेल तर पीक पद्धती बदलवायची आणि कोरडवाहू असेल, तर स्वत:च घरच्या सोयाबीन बियाण्याची व्यवस्था करायची, असा पॅटर्न सध्या जिल्ह्यात सुरू आहे.
बियाण्यांचे बुकिंग सुरू
जूनमधील खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील होलसेलर बियाणे विक्रेत्यांकडून कंपन्यांनी बुकिंग घेणे सुरू केले आहे. होलसेलर हे किरकोळ विक्रेत्यांकडून बियाण्यांचे बुकिंग व डव्हान्स पेमेंट घेत असून, तेच कंपन्यांना देत आहेत. यात होलसेलरची गुंतवणूक नाममात्र आहे. गेल्या हंगामात जिल्ह्यातील ठोक विक्रेत्यांनी सोयाबीन बियाण्यांचा प्रचंड काळाबाजार केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे बियाणे जिल्ह्याबाहेर शिर्डी-कोपरगावपर्यंत जादा दराने विकले. येथेही कृत्रिम टंचाईमुळे जादा दरात शेतकऱ्यांना बियाणे घ्यावे लागले. यातील काही होलसेलवर कृषी विभागाने कारवाई केली. मात्र, मर्जीतील एक-दोघांना थातूरमातूर नोटीस देऊन संरक्षणही दिले. अशा कारवाईला न जुमानणारे काही होलसेलर यंदाच्या खरीप हंगामात पुन्हा चोरट्या मार्गाने वरकमाईसाठी नियोजन करीत आहेत. त्यासाठी ते जिल्ह्यातील आधीच पिचलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांशी बेईमानीही करीत असल्याची ओरड आहे. या बियाणे विक्रेत्यांचे कृषी विभागातील यंत्रणेशी असलेले साटेलोटे त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.