रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. भूजल पुनर्भरणावर भर देण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.गेल्या पाच वर्षात पर्जन्यमानात सतत घट नोंदविण्यात आली आहे. पर्जन्यमानाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९११.३४ मिलीमिटर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बरसलेला पाऊस साठवून ठेवला जात नाही, तो वाहून जातो. जलाशयांमध्ये नाममात्र संचय होतो. यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती आणि उन्हाळ्यात टंचाई अशा स्थितीचा सामना जिल्ह्याला करावा लागतो.२०१३ मध्ये जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १५० टक्के पाऊस झाला. २०१४ मध्ये ७८ टक्के पाऊस पडला. २०१५ मध्ये ७७ टक्के, २०१६ मध्ये ९९ टक्के, २०१७ मध्ये ६१ टक्के, तर २०१८ मध्ये ७८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. एकूण पर्जन्यमानावर लक्ष केंद्रित केले तर पावसामध्ये सातत्य राहिले नाही. ७० ते १५० टक्के पाऊस जिल्ह्यात पडला.इतकेच नव्हेतर पावसाच्या दिवसात २५ दिवसापर्यंतचा खंडही पडलेला आहे. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. भूजलावरही मोठा परिणाम झाला. दरवर्षी भूजलाची पातळी एक मिटरमध्ये कमी-अधिक होत आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांसह प्रशासकीय यंत्रणेने याची हवी तेवढ्या गांभीर्याने दखल घेतलेली दिसून येत नाही.बेसॉल्ट आणि सायन्स स्टोन्सचा थर१५ तालुके बेसॉल्ट खडकापासून बनले आहे. वणी तालुका सायन्स म्हणजे खरपा दगडाच्या थरापासून बनला आहे. बेसाल्ट अधिक पाणी साठवून ठेवत नाही. तर सायन्स स्टोन पाणी साठवतो. तरी कोल माईन्समुळे पाण्याचा उपसा वाढला आणि भूजल खाली गेले आहे. इतर १५ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसाही वाढत आहे. मात्र जिल्ह्यातील १६ तालुक्यांचा भूस्तर लक्षात घेऊन पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
सावधान, जिल्ह्याची भूजल पातळी दरवर्षी घसरतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 9:51 PM
जिल्ह्याचे पर्जन्यमान मुबलक असले तरी यामध्ये सातत्य नाही. पावसात खंड पडत आहे. भूजलाच्या स्त्रोतावरही परिणाम झाला आहे. यामुळे जिल्ह्याचा भूजलस्त्रोत दिवसेन्दिवस घटत आहे. याबाबत भूवैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देपर्जन्यमानातही घट । पाणी उपशाचे प्रमाण वाढले, पावसाचे पाणी न मुरताच वाहून जाते