यवतमाळ : महंमद पैगंबराच्या जयंतीनिमित्त गुरुवारी यवतमाळ शहरातून हर्षोल्हासात जुलूस काढण्यात आला. ईद-ए-मिलादुन्नबीची ही मिरवणूक भल्या सकाळी कळंब चौकातून निघाली. हजारो मुस्लीम बांधवांच्या सहभागाने आणि प्रेषितांच्या जयघोषाने ही मिरवणूक आगळीवेगळी ठरली. नवीकोरी वस्त्रे, त्यावर शिंपडलेले अत्तर, फुलांची उधळण असा आगळा बाज होता. समाजबांधव एकमेकांची गळाभेट घेऊन मन:पूर्वक शुभेच्छा देत होते. चौका-चौकात जुलूसचे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीतील आबालवृद्धांसाठी सरबत, मिठाई आणि अल्पोपहाराची व्यवस्था ठिकठिकाणी करण्यात आली होती. यावेळी मक्का मदिनाची प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. जुलूसमधील सहभागी समाजबांधवांवर तोफेच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणूक कळंब चौकात पोहोचल्यानंतर जाहीर सभा झाली. यवतमाळ शहरासोबतच संपूर्ण जिल्ह्यात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी जुलूस काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव आदी ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने लक्ष वेधले.
मुबारक हो सबको
By admin | Published: December 25, 2015 3:10 AM