पोलीस पाटलाचा खून : चौघे पोलिसांच्या ताब्यात, यावलीत चूलही पेटली नाहीअकोलाबाजार : दारूबंदीवरून उद्भवलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या यावली (इजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र नामदेव राठोड (५५) यांना आपला जीव गमवावा लागला. वीरेंद्र यांचा दगडाने ठेचून खून केला गेला. वीरेंद्र यांच्या खुनात पोलिसांनी यावली पोडावरील महादेव टेकाम (३०), डोमा शिवणकर (३०), भगवान शिवणकर (५०), हुसेन आत्राम (३५), सुरेश आडे संशयित म्हणून यांना ताब्यात घेतले. वीरेंद्र हे गेल्या दहा वर्षांपासून दारूबंदी चळवळीत सक्रिय होते. गुरुवारी रात्री गावातील पोडावर दारूतूनच वाद पेटला. या वादात मध्यस्थीसाठी त्यांना बोलविले गेले. त्यांनी वाद मिटविलासुद्धा. मात्र हीच मध्यस्थी त्यांच्या जीवावर बेतली. घराकडे निघाले असताना त्यांचा दगडाने ठेचून खून केला गेला. त्यानंतर गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालय व पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयावर प्रेतासह मोर्चा वळविला. यावलीतील कुणीही आज कामावर गेले नाही किंवा कुणाकडे चुलही पेटली नाही. वीरेंद्र यांचा मुलगा व सून पुण्याला नोकरीवर आहेत. पत्नीही मुलाकडेच असल्याने वीरेंद्रसुद्धा पुण्याला जाणार होते. आदर्श शेतकरी म्हणून ते परिसरात परिचित होते. विशेष असे ३ जुलै रोजी वडगाव जंगल पोलीस ठाण्यात दारूबंदीच्या अनुषंगाने बैठक बोलविण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच गावच्या पोलीस पाटलाचा खून केला गेला. रात्री १० वाजता पोलिसांची जीप कारेगाव येथे होती. तेथून दोन किमी अंतरावर यावली (ईजारा) येथील पोडावर १०.३० वाजता वाद उद्भवल्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही पोलीस यावलीत पोहोचले नाही. त्यामुळेच गावकऱ्यांचा पोलिसांविरोधात रोष आहे. त्यामुळेच सरपंच, सदस्य व गावकरी यवतमाळ मुख्यालयी प्रेत घेऊन धडकले होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी त्यांची समजूत काढली. त्यामुळे तणाव निवळला. यावली ग्रामपंचायतीने यापूर्वीच दारुबंदीसाठी ठराव घेतला होता. यावली गावात दारूच्या पाच भट्ट्या असून नियमित २० पेट्या दारू बाहेरुन पुरवठा होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच पोलिसांवर हप्तेखोरीचा आरोप होत आहे. (वार्ताहर)
दारूबंदीतील मध्यस्थी जीवावर बेतली
By admin | Published: July 04, 2015 2:48 AM