पुसद - जनतेच्या कराच्या पैशांतून जनसुविधा उभारण्यास नगरपालिका अपयशी ठरली. कुंभकर्णी झोपेतील नगरपालिकेला जागे करून रस्ता दुरुस्तीसाठी काँग्रेस नगरसेवकाने आता भीक मांगो आंदोलन करण्याचा निर्ध्रा्र केला आहे.
पुसद नगरपालिका चर्चेचाच नव्हेतर निषेधाचा विषय बनली आहे. सुविधा मिळत नसल्याने शहराची अवस्था खेडयापेक्षाही वाईट झाली आहे. समस्यांचा पाढा वाचूनही नगरपालिकेवर कोणताही परिणाम होत नाही. ज्या पालिकेचा उगम दिवंगत वसंतराव नाईक व दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या पुढाकारामुळे झाला, त्याच शहरातील चौकाची मुख्य शान असणाऱ्या वसंतराव नाईक चौकापासून ते शनि मंदिरापर्यंत व वसंतराव नाईक चौकापासून ते मुखरे चौकापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.
अनेक नागरिक, संघटनांनी रस्ता दुरुस्तीसाची मागणी कंली. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेला जागे करण्यासाठी काँग्रेस नगरसेवक साकीब शाह यांनी भीक मांगो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे ही समस्या वाढून कोणाचा मृत्यू होऊ नये, यासाठी भीक मांगो आंदोलन करून लोकवर्गणीतून रस्ता दुरुस्ती करण्याचा मानस ठेवत त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. जनतेच्या सहकार्याने आंदोलन यशस्वी करावयाचे असल्याने ज्या नागरिकांना रस्ता दुरुस्तीसाठी भीक मांगो आंदोलनामध्ये मदत करावयाची आहे, त्यांनी २२ ते २४ मार्च दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाईक चौक, बिरसा मुंडा चौक, मुखरे चौक येथे मदत जमा करावी, असे आवाहन नगरसेवक साकीब शाह यानी केले आहे.