पुंडलिक पारटकर।लोकमत न्यूज नेटवर्कमाहूर : येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी परिक्रमायात्रा आयोजित केली जाते. यासाठी राज्य व लगतच्या राज्यातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल होतात. या यात्रे दरम्यान भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांची महत्वाची भूमिका असते. यावर्षी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची शक्यता गृहित धरून २० आॅगस्टला येथील पंचायत समितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी यू.डी. मादाडे, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. याबैठकीत विविध निर्णय घेण्यात आले.परिक्रमायात्रेसाठी एसटीने ६५ अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या. पोलिसांनी १० अधिकारी व ९७ कर्मचाऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी सोपविली. ६५ बस माहूर बसस्थानक ते दत्त शिखरापर्यंत सेवा देणार आहे. परिक्रमायात्रा दत्तशिखर, कमंडलू तीर्थ, काळापाणी, अनुसयामाता मंदिराच्या पाठीमागून सयामाय टेकडी, मातृतीर्थ, पांडव लेणी, देवदेवेश्वरी, वनदेव, कैलास टेकडी, शेख फरीदबाबा दर्गा, सर्व तीर्थ या मार्गे ४० किलोमीटरची परिक्रमा करणार आहे. प्रशासन तत्पर असल्याचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले.धनोडा येथे वाहतूक ठप्पमहागाव/ धनोडा : परिक्रमा यात्रेसाठी हजारो यात्रेकरू माहूरकडे येत आहे. मात्र धनोडा येथून माहूरकडे जाणाऱ्या मार्गावरील पैनगंगेच्या पुलावरील कठडे तुटल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. माहूरकडे जाणारी एकेरी वाहतूक शनिवारी दुपारी ३ वाजतापासून ठप्प पडली. त्यामुळे धनोडा टी पॉर्इंटवर यवतमाळ, पुसद, महागावकडे जाणाऱ्या मार्गावर जवळपास पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या दहा वर्षात प्रथमच परिक्रमा यात्रेसाठी अलोट गर्दी झाली आहे.
माहूर गडावर रक्षाबंधनानिमित्त परिक्रमा यात्रेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 9:52 PM
येथील दत्तशिखर गडावरील प्रमुख यात्रेपैकी एक असलेल्या परिक्रमा यात्रेला (रक्षाबंधन) शनिवारपासून सुरूवात झाली. परिक्रमायात्रेसाठी तेलंगणा व विदर्भातील हजारो भाविक माहूरमध्ये दाखल झाले असून सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ठळक मुद्देविदर्भ-मराठवाडा-तेलंगणातून हजारो भाविक दाखल : अतिरिक्त पोलीस तैनात, आगीच्या घटनेनंतर यात्रेसाठी प्रशासन सज्ज