लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : श्रमदान करून गॅबियन बंधारा पूर्ण केल्याचा आनंदोत्सव बेचखेडावासियांनी साजरा केला. उपस्थितांना पेढा वाटण्यात आला. व्ही चिन्ह दाखवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. मंगळवारी सकाळी ६ ते १० या वेळात अथक श्रमदान करून गॅबियन बंधाऱ्यावर अखेरचा हात फिरविण्यात आला.पाणी फाऊंडेशन अंतर्गत स्पर्धेत बेचखेडा हे गाव सहभागी झाले आहे. पाणी प्रश्न कायमचा दूर करण्यासाठी या गावातील नागरिकांनी या कामामध्ये स्वत:ला झोकून घेतले. १२.५ मीटर लांब ८ फूट रुंद असा गॅबियन बंधारा अवघ्या काही दिवसात तयार झाला. ९ ते १० ट्रॅक्टर्स गोटे आणि जाळी वापरुन बंधारा उभा करण्यात आला. यासाठी गावातील लहान-मोठ्यांनी हातभार लावला.सरपंच रमेश भिसनकर, उपसरपंच दत्ता गुघाणे, ग्रामसेविका निशिगंधा क्षीरसागर, सदस्य रमेश पवार आदींच्या प्रोत्साहनामुळे ही उपलब्धी गावाला मिळाली आहे. श्रमदानासाठी शिवाजी राऊत, पुंडलिक मडावी, शोभा मडावी, नर्मदा खडके, गीताबाई भेंडे, विष्णू खाकरे, धर्मा आत्राम, दुर्गादास शिवणकर, पंजाब भिसनकर, शंकर खाकरे, विनोद लोटे आदींच्या श्रमदानाने बंधारा पूर्ण करण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्याचा आनंद या गावातील नागरिकांच्या चेहºयावर झळकत होता.
बेचखेडात बंधारा निर्मितीचा आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:01 AM