बोटोणी : विविध शासकीय योजनांपासून अनेक लाभार्थी अद्याप वंचित आहेत. त्यांना लाभ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गटविकास अधिकाऱ्यांना दिलेलया निवेदनातून देण्यात आला आहे.मारेगाव पंचायत समिती व ग्रामपंचायतीत शासनाकडून मिळणाऱ्या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांना मिळत नाही़ लाभार्थ्यांनी अर्ज केला असता, कोणत्याही प्रकारची माहिती न देता परस्पर अर्ज डावलला जातो. लाभधारकांना योजनेचा लाभ न देता इतरांना लाभ दिला जातो. घरकुल लाभार्थ्यांना योजनेबाबत पूर्णत: माहिती दिली जात नाही़ घरकुल पूर्ण झाल्यानंतर त्रुटी दर्शवून बांधकाम अभियंत्याकडून रकमेसाठी अडवणूक केली जाते़ शासकीय योजनेच्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांची यादी कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावली जात नाही़ लाभार्थी कार्यालयात आला असता, संबंधित कर्मचारी लाभार्थ्यांना हाकलून लावतात, असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.कार्यालयात कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी राहात असून चहा टपऱ्यांवर त्यांची उपस्थिती जास्त आढळते. लाभार्थी कर्मचाऱ्यांची ताटकळत वाट बघत असतात़ त्यात अनेक लाभार्थ्यांची मजुरी, पैसे व वेळ वाया जातो़ त्याचा नाहक भुर्दंड त्यांना सहन करावा लागतो.विविध योजनांचे लाभार्थी आता पंचायत समितीच्या चकरा मारून थकले आहेत. त्यांची मजुरीही बुडत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून पंचायत समितीच्या कामकाजात परदर्शकता आणावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक साठे यांनी दिला आहे. (वार्ताहर)
शासकीय योजनांपासून लाभार्थी वंचित
By admin | Published: August 09, 2014 1:26 AM