दिग्रस : कोरोना काळात येथे मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. दररोज किमान १५० गरजवंत या थाळीचा लाभ घेत आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले. राज्यात मिशन ' ब्रेक द चेन ' अंतर्गत कडक निर्बंध घातले. कोरोना परिस्थितीत दोन वेळेच्या जेवणाची चिंता अनेकांना सतावत आहे. मात्र, दिग्रस येथे शिवभोजन थाळी सेंटरवर दररोज १५० गरजवंत लोकांना मोफत जेवणाची थाळी दिली जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेल्या शिवभोजन थाळी सेंटरवर दररोज १५० गरजवंतांना दररोज दुपारी १२ ते २ या वेळेत मोफत शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत मोफत पार्सल जेवण दिले जात आहे. या शिवभोजन थाळीचा लोकांना आधार मिळत आहे. हा उपक्रम येथील महेश डगवाल राबवित आहे. प्रत्येक थाळीमागे २४ रुपये अनुदान त्यांना मिळत आहे. वरण, भाजी, भात व दोन पोळी असा मेनू असून ते मोफत वितरित केले जात आहे. कोरोना काळात मजूर, कामगार, सामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार ठरत आहे.