यवतमाळ : आयपीएल टी-२० क्रिकेट सामन्याची रंगत सुरू झाली आहे. शुक्रवारी हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट या क्रिकेट मॅचवर मोबाईल फोन व लॅपटॉपच्या सहाय्याने हार-जीतचा सट्टा चालविला जात असल्याची माहिती मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ पथकाने वणी येथे धाड टाकून दोघाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून १ लाख ६७ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
अफसर खान अनवर खान पठाण हा वणीतील शास्त्रीनगरमधील रहिवासी असून तो त्याच्या मालकीच्या आर.के. कोलडेपो वणी येथील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आयपीएल सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून घेतल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासह घटनास्थळी रवाना होवून छापा मारला. यावेळी अफसर खान अनवर खान पठाणसह रिजवान सय्यद रियाज सय्यद (रा. मोमीनपुरा यवतमाळ) हे दोघे मोबाईल लॅपटॉपवरून सट्टा घेत असल्याचे आढळून आले.
पथकाने एक लाख ६७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सपोनि अमोल मुडे, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे यांच्यासह योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रजनिकांत मडावी आदींच्या पथकाने केली.