प्रकाश सातघरेलोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : अरुणावती प्रकल्पातून पाणी घेऊन शहर आणि ग्रामीण भागातील काही गावांची तहान भागविली जाते. सध्या तरी या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली नसली तरी पुढील काही दिवसात हा प्रश्न तीव्रतेने जाणवणार असल्याचे चित्र दिसत आहे. अरुणावती प्रकल्पामध्ये सध्या केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. ग्रामीण भागात असलेल्या इतर स्रोतांकडे यंत्रणेकडून दुर्लक्ष केले गेल्याने त्यातील अनेक स्रोत निकामी झाले आहेत. पाणीप्रश्न तीव्र झाल्यास तातडीने उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. काही गावांमध्ये भीषण पाणीप्रश्न निर्माण होणार हे निश्चित आहे. त्यामुळे पंचायत समिती प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दिग्रस शहराला सद्य:स्थितीत सहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. आजची परिस्थिती पाहता पुढील काळात या दिवसांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिकेकडे साधनांचा अभाव आहे. वेळेवर टाक्या भरून पाणीपुरवठा केला जातो. साठवण करण्यासाठी इतर कुठलीही साधने नसल्यामुळे पाणीपुरवठा लांबणीवर पडतो.
१०० हून अधिक हातपंप पडले बंददिग्रस तालुक्यात गावे, वाड्या मिळून गावसंख्या ८१ इतकी आहे. तालुक्यात एकूण ४३६ हातपंप असून त्यातील १०० हून अधिक बंद स्थितीत आहे. पाणीप्रश्न गंभीर झाल्यास लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. अशा वेळी खासगी विहिरींचे अधिग्रहण, हातपंपाची दुरुस्ती आदी उपाययोजना प्रशासनाला कराव्या लागणार आहे.
कृती आराखडा जिल्ह्याकडे पाठविणार
- दिग्रस तालुक्यातील आमला (ख), गांधीनगर, हरसूल, भिलवाडी, मोरखेड, कलगाव, डेहणी, आनंदवाडी, खंडापूर, आरंभी, साखरा, वडगाव तांडा, चिचपात्र, रुई तलाव, माळहिवरा या गावांमध्ये पाणीप्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत कृती आराखडा तयार केला आहे.
- दिग्रस शहरातील सहा दिवसाआड पाणीपुरवठ्याविषयी नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे. नगर परिषदेचे नियोजन नसल्यानेच नागरिकांना सहा दिवस नळाची प्रतीक्षा करावी लागते. पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
- दिग्रस तालुक्यातील १६ गावांसाठी पाणीपुरवठा करण्याकरिता खासगी विहिरी अधिग्रहणाची तालुका प्रशासनाची तयारी आहे. त्यांना कृती आराखड्यामध्ये २५ गावांमध्ये पाणीपुरवठ्याकरिता इतर काही उपाययोजना सुचविल्या गेल्या आहेत. तथापि नागरिकांनी पाणी बचतीचे आवाहन केले आहे.
शहराच्या पाणीपुरवठ्यात विजेचा खोडा
दिग्रस शहरात पाणीटंचाई निर्माण झालेली नाही. सहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची उपलब्धता असली तरी टाक्याअभावी साठवता येत नाही. शिवाय, वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे पाणी वितरणात अडथळे निर्माण होत आहेत.- गाैरव मांडळे, पाणीपुरवठा अभियंता, नगरपरिषद, दिग्रस
दिग्रस तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. बंद पडलेल्या हातपंपांची दुरुस्ती, विहिरींचे खोलीकरण, खासगी विहिरी अधिग्रहणाकरीता कृती आराखडा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले जाणार आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.- रमेश खारोडे, गटविकास अधिकारी, दिग्रस