रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. या संधीचा फायदा घेत काही फ्राॅड करणाऱ्या व्यक्ती सायबर क्राईम घडवून आणत आहेत. नामांकित कंपन्यांसारखीच डमी वेबसाइट बनवून सुशिक्षित बेरोजगारांना गंडा घालण्याचे काम ही मंडळी करीत आहेत. यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी कायम ठेवीत आयुष्यात अनेक संधी आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. तरच अशा फ्राॅड करणाऱ्या व्यक्तींना आळा घालता येईल.ऑनलाइन अकाउंट उघडून काही व्यक्ती आपले संकेतस्थळ प्रसिद्ध करीत आहेत. यावर जाहिरात प्रसिद्ध करून सुशिक्षित बेरोजगारांना प्रथम ते पदासाठी काही पैसे खात्यात वळते करायला लावतात. आपला बँक अकाउंट नंबरही मागतात. मुळात नोकरी लागल्यानंतरच या सगळ्या बाबी द्यायच्या असतात. याच ठिकाणी अनेकांची चूक होते. बनवेगिरी करणाऱ्या व्यक्ती बेरोजगारांच्या खिशातून पैसे उकळतात.
अशी करा खातरजमा
कुठल्याही नोकरीवर घेताना सुशिक्षित बेरोजगाराकडून प्रोसेसिंग फी जास्तीत जास्त एक हजार रुपये आकारता येते. शासकीय दर यापेक्षाही कमी आहे. यापेक्षा जास्त पैसे मागितले तर संशयाला वाव आहे.नोकरीवर घेताना मुलाखत होण्यापूर्वीच बँक अकाउंट मागितले जात असेल तर चुकूनही ते बँक अकाउंट देऊ नका. सर्व बाबी अंतिम टप्प्यात आल्यानंतरच या बँक अकाउट देता येते.नोकरीवर लावताना कुठलीही सत्यप्रत संबंधित व्यक्तीकडे देऊ नका. त्याची झेराॅक्स देताना त्याखाली कुठल्या कामासाठी झेराॅक्स देत आहे याचा उल्लेख करूनच स्कॅन करून संबंधितांना द्या.
जागरूक व्यक्ती या प्रकाराला रोखतातपोलिसात घडलेला गुन्हा आणि सायबर क्राईममध्ये मोठा फरक आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी फारसे हाती नसते. आपली माहिती तत्काळ मिळाली तरच असे अकाउंट सील करता येते. त्यासाठी जागरूकता गरजेची आहे. - अमोल पुरी, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर सेल
अशी होऊ शकते फसवणूक
प्रकरण १एका प्रकरणात एका मुलीला नोकरी लावण्यासाठी कंपनीने ऑनलाइन ऑफर दिली. ही प्रक्रिया पार पाडताना संबंधिताच्या खात्यातून एक लाख ८० हजार रुपये वळते झाले. या प्रकरणात संबंधित व्यक्तीने कायदेशीर कारवाईसाठी संपूर्ण प्रकरण वर्ग करण्यात आले.
प्रकरण २४८ हजार रुपयांची गाडी २८ हजार रुपयांमध्ये देण्याची ऑफर फेसबुकवरून आली. या गाडीचे केवळ चित्र पाहून संबंधित व्यक्तीने विक्रेत्याच्या खात्यात पाच हजार रुपये जमा केले. यानंतर डिलिव्हरी मिळेल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात महिना लोटला तरी गाडी मात्र मिळाली नाही.
प्रकरण ३एका प्रकरणात खात्यामधून पैसे वळते झाल्यानंतर त्या व्यक्तीने सायबर सेलशी संपर्क केला. यानंतर सायबर सेलने पैसे वळते करणाऱ्या गुन्हेगाराच्या खात्याचा शोध घेतला. यावेळी ही रक्कम एका खात्यामध्ये होती. त्या ठिकाणावरून त्यांना परत आणता आली. जागरूकतेने झालेला फ्राॅड वाचला.