हरिओम बघेल आर्णीराजकीय क्षेत्रात महिला कितीही मोठ्या पदावर असली तरी कारभार मात्र घरातील पुरूषच सांभाळतो, असा सर्वत्र अनुभव असतो. महिलांना आजही चूल आणि मूल एवढेच सिमीत करणारे महाभाग कमी नाही. परंतु आर्णी तालुक्यातील भानसराच्या सरपंच जिजाबाई धुर्वे त्याला अपवाद आहेत. गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या ठिकाणच्या शासकीय कार्यालयात जाऊन विनंती करणारी आणि वेळप्रसंगी लढा देणारी ही महिला आहे. आपल्या नेतृत्व गुणाच्या भरोशावर बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी गावात विकासाची पहाट आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आर्णी तालुक्यातील भानसरा हे चिमुकले गाव. विकासापासून कोसो दूर, याच गावात असणाऱ्या जिजाबाई धुर्वे यांना ही परिस्थिती अस्वस्थ करीत होती. त्यांनी गावातील महिलांचे संघटन सुरू केले. बचत गटाच्या माध्यातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र गावात असलेली दारू यात अडसर ठरत होती. त्यामुळेच त्यांनी दारुबंदीसाठी महिलांना प्रोत्साहीत केले. महिलांच्या सहकार्याने भानसरात दारुबंदी केली. त्यांची ही तळमळ पाहून त्यांना गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत पाठविले. दुसऱ्या पंचवार्षीकमध्ये गावकऱ्यांच्या विश्वासावर निवडून आल्या. त्यानंतर त्यांना उपसरपंच म्हणून संधी मिळाली. यावेळी त्यांनी गाव तंटामुक्त करण्याचा विडा उचलला. प्रत्येक कार्यालयात जाऊन गावाच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू केला. गावाच्या विकासासाठी झटणारी ही महिला अल्पावधीतच परिसरातही लोकप्रीय झाली. गावाचा विकास होत असल्याचे पाहून गावकऱ्यांनी त्यांना तिसऱ्यांदा निवडूनच दिले नाही तर सरपंचपदी विराजमान केले. त्यांच्या कार्याची ही पावतीच होती. आता गावाचा विकास हेच त्यांचे ध्येय होते. तालुक्यात इतरही गावात महिला सरंपच आहेत. परंतु गावाच्या विकासासाठी पुरूषांच्या बरोबरीने शासकीय कार्यालयात जाऊन लढा देणाऱ्या एकमेव महिला म्हणजे जिजाबाई होय. पुरूषांची मक्तेदारी खोडीत काढत स्वत:च गाव विकासाची सुत्रे हातात घेतली. गावाचा विकास होत असून, गावकऱ्यांचाही त्याच्यावर तेवढाच विश्वास आहे. महिलांनी प्रामणिकपणे काम केले तर गावकरी त्यावर विश्वास ठेवतात असे जिजाबाई सांगतात. सध्या जिजाबाई परिसरात रणरागिणी म्हणूनच ओळखली जाते.
गावाच्या विकासासाठी लढा देणारी भानसराची रणरागिणी जिजाबाई
By admin | Published: March 08, 2015 2:06 AM