भाजपाला शेतकरी, शेतमजूर व्यापाऱ्यांची नाराजी भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 10:06 PM2018-12-11T22:06:44+5:302018-12-11T22:07:12+5:30
पाच राज्यात भाजपाची वाताहत होण्यामागे शेतकरी, व्यापारी व समाजातील अन्य घटकांची भाजपावर असलेली नाराजी हे प्रमुख कारण असल्याची प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाच राज्यात भाजपाची वाताहत होण्यामागे शेतकरी, व्यापारी व समाजातील अन्य घटकांची भाजपावर असलेली नाराजी हे प्रमुख कारण असल्याची प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. भाजपाच्या या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धतीही तेवढीच कारणीभूत असल्याचेही तिवारी यांनी सांगितले.
किशोर तिवारी म्हणाले, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा राज्यांच्या विधानसभेच्या मंगळवारी लागलेल्या निवडणूक निकालावरून ग्रामीण भारतात शेतकरी, व्यापारी आणि विशेषत: कापूस उत्पादकांची भाजपावर नाराजी असल्याचे स्पष्ट झाले. या निमित्ताने ही नाराजी उघड झाली. ही भाजपा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी चिंतनाची बाब आहे. भारत सरकारचा कृषी व ग्रामीण विकास कार्यक्रम, धोरणांच्या अंबलबजावणीतील प्रशासकीय कुचराई, कृषीमालाचे पडलेले भाव, अनियंत्रित लागवड खर्च, बँकांचा विस्कळीत पतपुरवठा, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या कार्यक्रमांना बँका व सनदी अधिकाऱ्यांकडून मिळणारे असहकार आदी बाबींचे मूळ भाजपाच्या पराभवात आहे. किमान आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन धोरण ठरवून उपाययोजना कराव्या, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मार्गी लावावे, अन्यथा पाच राज्यांच्या निकालाची पुनरावृत्ती होईल, असा गर्भित इशाराही किशोर तिवारी यांनी दिला आहे.
मोदींच्या दाभडीतील घोषणांचाही परिणाम
नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. भाजपाची सत्ता येताच ‘अच्छे दिन’ येतील अशी हमी शेतकऱ्यांना देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात साडेचार वर्षात शेतकऱ्यांसाठी काहीच केले गेले नाही. त्याचाच परिणाम पाच राज्यातील निवडणुकांवर दिसून आला. शेतकऱ्यांनी भाजपाला स्पष्टपणे नाकारले, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी नोंदविली. असेच चित्र आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातही पहायला मिळेल, असा विश्वास मोघे यांनी व्यक्त केला.