देवराव दत्तुजी बोढाले (वय ५५, रा. पेटूर) असे अपघातात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी देवराव बोढाले हे शेतातील कामे आटोपून बैलांना घेऊन घराकडे परत जात होते. दरम्यान, पेटूर गावाजवळ येताच मुकुटबनहून सिमेंट कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन वणीमार्गे भरधाव जाणाऱ्या मिनी बस (एम.एच.३४-एबी.८२४६)ने बोढाले व त्यांच्या एका बैलाला जोरदार धडक दिली. या अपघातात देवराव बोढाले यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, तर बैलालाही गंभीर इजा झाल्याने बैलाचाही मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी बोढाले यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पुढील तपास जमादार ईरपाते करीत आहेत.
भरधाव मिनी बसने शेतकऱ्यासह एका बैलाला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:44 AM