यवतमाळ : राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधा-यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करीत आहेत. मात्र लगतच्या भविष्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या उमेदवारीत याचे पडसाद पाहायला मिळतील, असे भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा यवतमाळात दाखल झाली. बुधवारी पुढच्या प्रवासापूर्वी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रवाद व देशाच्या मुद्द्यावर झाली. राज्यातील निवडणुका या स्थानिक मुद्द्यावर होतात. युती सरकारने मागील पाच वर्षात सर्वांचीच प्रचंड निराशा केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीला निश्चितच चांगले दिवस आहेत. भाजप-सेनेत जाणा-यांची संख्या, त्या पक्षातील आज असलेले आमदार आणि राज्यातील २८८ जागा याचे गणित जुळणारे नाही. त्यामुळे निवडणूक उमेदवारी दाखल होताना अनेक राजकीय भूकंपाचे धक्के पाहायला मिळतील. राष्ट्रवादीने नव्या चेह-यांना संधी दिली.डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी यांच्या सारखे प्रतिभासंपन्न युवक पक्षाकडे आहेत. पक्षांतराबाबत जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत. काँग्रेससोबतची आघाडी निश्चित असून, मित्र पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ४० वरून आता १४४ जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी दाखविली आहे. जसे जसे दिवस जवळ येतील तसतशी स्थिती बदलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. खासदार उदयनराजे भोसले, पुसदचे आमदार मनोहरराव नाईक यांच्या पक्षांतराच्या चर्चेबाबत आपल्याकडे कोणतीच माहिती नाही. मात्र उदयनराजे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्नरत असल्याचे पवार म्हणाले. राज्य सरकार ७२ हजार जागांची मेगा भरती घेणार होते, त्याचे काय झाले, शिक्षकांची भरती बंद आहे. यवतमाळातील एका मोठ्या समूहाने ३०० कंत्राटी कामगारांना कमी केल्याचे सांगितले जाते. एकंदरच राज्यात मंदीची स्थिती आहे. अशा वेळेस सरकारातील मंत्री मौज मस्तीत दंग आहेत. निवडणुकीच्या तोंडावर आठवड्यातून दोनदा कॅबिनेटच्या बैठका घेऊन विविध आमिष दाखविले जात आहे. मात्र घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायला किमान दोन महिन्यांचा अवधी लागतो. शासन केवळ धूळफेक करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. या पत्रकार परिषदेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, वक्ते अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया आदी उपस्थित होते.
पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप; अजित पवारांचे भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 3:06 PM