नेर (यवतमाळ) : आत्याच्या भेटीसाठी दुचाकीने निघालेल्या भाच्यावर काळाने झडप घातली. दुचाकी खड्ड्यात कोसळल्याने जखमी झालेल्या युवकाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना सावंगा मार्गावर शनिवारी घडली. मिलिंद धनराज खडसे (२५, रा. सांगलवाडी, ता. दारव्हा) असे मृताचे नाव आहे.
मिलिंद हा पुणे येथे खासगी कंपनीत होता. दिवाळी सुटीत तो गावी आला. शनिवारी सावंगा (ता. नेर) येथे आत्या प्रिशीला गुलाब सोनोने यांना भेटण्याकरिता दुचाकीने (एमएच २९ - बीएक्स ८६९२) सकाळी १० वाजता निघाला. मार्गात नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. यात मिलिंदच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्याला तातडीने नेर शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. प्रथमोपचार करून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. नागपूर येथे नेताना मिलिंदने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण व मोठा आप्त परिवार आहे.
सावंगा रस्त्याची दैना
सावंगा रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता जागोजागी उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर लहान-मोठे अपघात नित्याची बाब झाली आहे. रस्ता दुरुस्तीसाठी लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणेला वारंवार निवेदन देण्यात आले, परंतु उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. मिलिंद खडसे हा खराब रस्त्याचाच बळी ठरला असल्याचा आरोप होत आहे. या रस्त्याचे काम त्वरित न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनोज भोयर, शुभम खोब्रागडे, आशिष भोयर, रूपेश अर्मळ आदींनी दिला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था गंभीर आहे. हे रस्ते तयार करतानाच त्याच्या गुणवत्तेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. सहा महिन्यात रस्ता उखडतो. या खड्डे असलेल्या रस्त्यावरून जीवाची बाजी लावून प्रवास करावा लागतो.
दुचाकी अपघाताचे प्रमाण सर्वाधिक
खड्डेयुक्त रस्ते अपघाताला कारण ठरत आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दळणवळणासाठी दुचाकीचा वापर केला जातो. पर्यायी वाहनांची व्यवस्था नाही. या रस्त्यावरून दुचाकी अपघात वाढले आहे. यात अनेकजण गंभीर जखमी होतात. तर काहींना जीव गमवावा लागतो. यामुळे संसार उघड्यावर येत आहेत.