महाराष्ट्र दिन : ‘लोकमत’चे सुहास सुपासे सन्मानित यवतमाळ : जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बळीराजा चेतना अभियानाचे जिल्हास्तरीय पुरस्कार महाराष्ट्र दिनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. येथील समता मैदानावर (पोस्टल ग्राऊंड) झालेल्या समारंभात ‘लोकमत’चे उपसंपादक सुहास सुपासे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मणराव राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंघला, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. यावेळी वृत्तपत्रे, नियतकालीकातून लिखाण करणारे, वृत्तपत्राचे स्तंभलेखन या घटकातील प्रथम पुरस्कार ‘लोकमत’चे उपसंपादक सुहास कालीदास सुपासे आणि दिव्य मराठीचे अमोल ढोणे यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विभागून देण्यात आला. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते देण्यात आला. तर द्वितीय पुरस्कार संतोष पुरी (देशोन्नती) आणि टी.ओ. अब्राहम (टाईम आॅफ इंडिया) यांना तर तृतीय पुरस्कार शबीर खान (सकाळ), कपिल देवचंद शामकुंवर (एबीपी माझा) यांना विभागून पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशोगाथा घडविणारे शेतकरी या घटकातील प्रथम पुरस्कार माणिक कदम (कळंब), द्वितीय अशोक वानखडे (उमरखेड), तृतीय केशव निमकर (कोठा, ता. बाभूळगाव) यांना देण्यात आला. प्रवचनकार, नाटककार, गायक, पथनाट्य, कीर्तनकार, कृषी मेळावे आदी घटकातील प्रथम पुरस्कार दत्तात्रय देवराव मार्कंड (आर्णी), द्वितीय पंकज खंडूसिंग राठोड (वाशिम), नागोराव भुजंगराव मुळे (उमरखेड) आणि तृतीय गंगाधर घोटेकर (राळेगाव) यांंना देण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक संस्था घटकातील प्रथम पुरस्कार राळेगाव येथील गुरुदेव सेवा मंडळ, द्वितीय घाटंजी येथील स्वरजीवन सांस्कृतिक कला व बहुद्देशीय संस्था यांना तर तृतीय पुरस्कार प्रीती बहुद्देशीय ग्रामविकास संस्थेला देण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या शासकीय कर्मचारी घटकातील प्रथम पुरस्कार तलाठी श्याम जयवंत रणनवरे यांना देण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते, लोकसेवक, पंचायत राज संस्थेचे सदस्य या घटकातील प्रथम पुरस्कार डॉ. प्रवीण गिरी, द्वितीय पुरस्कार विशाल खांदणकर, तृतीय पुरस्कार ग्रामस्तरीय समिती शेंबाळपिंपरी (ता. पुसद) यांना देण्यात आला. (नगर प्रतिनिधी)
बळीराजा चेतना अभियान पुरस्कार वितरण
By admin | Published: May 02, 2017 12:06 AM