महागाव : तालुक्यात सेंद्रिय खतनिर्मितीबरोबरच जैविक इंधन निर्मितीचा प्रकल्प लवकरच उभारला जाणार आहे. जैव इंधन प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच गुंज परिसरातील नागेशवाडी (वेणी धरण रोड) येथे झाले. या प्रकल्पातून प्रति दिवस १०० टन (एक लाख किलोग्रॅम सीएनजी, पीएनजी गॅस) व १५० टन उच्च प्रतीच्या सेंद्रिय खताची निर्मिती होणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य अधिकारी जगदीश पायघन, मुख्य प्रवर्तक रमेश गोरे, प्रदीप पायघन यांनी दिली. या प्रकल्पाला लागणाऱ्या गजरा व हत्ती गवताच्या लावगडीच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना एकरी एक ते दोन लाख रुपये उत्पन्न होण्याची शक्यता त्यांनी व वर्तविली. सोबतच १,५०० ते २,००० हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
भूमिपूजनला ज्येष्ठ शेतकरी नेते नागोराव पाटील कदम, चंपतराव खंदारे, सुनील बोरगडे, प्रमोद जाधव, दत्तराव बागल, शेषराव पुंड, गजानन तळणकर, शरद मोतीपवार, संजय मते, वाघोजी तडस, राजेंद्र काळे, शिवराम शेटे उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश खाडे, तर आभार बाळासाहेब वाळुककर यांनी मानले.