लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अशी पाखरे येती,आणिक स्मृती ठेवुनी जाती,दोन दिसांची रंगत संगत,दोन दिसांची नातीकवी मंगेश पाडगावकरांच्या या काव्याचा प्रत्यक्ष अनुभव सध्या यवतमाळमधील चांदुरे नगरातील शिक्षकांच्या वस्तीत भल्या पहाटे भरणाऱ्या पक्ष्यांच्या हजेरीहून पहायला मिळत आहे. हिवाळ्याची बोचरी थंडी आणि दीपावली सणाच्या आनंदोत्सव दरम्यान लालबुडी भिंगरी, मंदिर देवकन्हाई ( मस्जिद अबालील ) पक्ष्यांची शाळा बघून येथे येणाऱ्या पाहुण्यांचे सुद्धा डोळ्यांचे पारणे फिटत आहे. धामणगाव-यवतमाळ रस्त्यालगत मोहा फाटा नजीक चांदुरे कॉलोनी (शिक्षक कॉलोनी) आहे. सकाळी सुर्योदयादरम्यान विद्युत तारांवर सुमारे ५० ते ६० हजार एवढ्या संख्येत पक्ष्यांचा थवा असतो. सकाळी अंदाजे २ तास पक्षांचा विहंगम नजारा पहायला मिळतो.अनेक पक्षीमित्र पक्षीनिरीक्षणासाठी दुरुवर भ्रमंती करतात पण घरबसल्या हे पक्षी पहायला मिळत असल्याने स्थानिक रहिवाश्यांना सुखद अनुभव मिळत आहे. या परिसरात आजूबाजूला ३ पानस्थळ जागा असून यामध्ये बोरगाव धरण, टाकळी तलाव, मोहा तलावाचा समावेश आहे. स्थानिक बोरगाव प्रकल्प येथे ८७ पक्षी,तर निळोना येथे ७२ पक्षी तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकूण ३४३ पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांनी पक्षीसप्ताह दरम्यान केली. यामध्ये अमेरिका,युरोप या खंडातील विविध प्रजांतीचे १०४ पक्ष्यांमध्ये स्थानिक स्थलांतर करणारे ग्रेटर फ्लेमिंगो आणि विदेशी स्थलांतरित पक्षी ब्लॅक टेल गॉडवीट आदींचा समावेश आहे.
सुखद आनंदानुभवहे पक्षी गेल्या आठ दिवसापासून अगदी भल्यापहाटे येतात.उन्ह कोवळे असेपर्यंत थांबतात व नंतर अचानक दिसेनासे होतात. गेल्या अनेक महिन्यापासून शाळा बंद आहे परंतु भल्या पहाटे घराभोवती होणारा पक्ष्यांचा किलबिलाट हा अनुभव खरचं खूप सुखद आनंदानुभव आहे. असे जिल्हा परिषद केंद्रीय शाळा वरदचे (पं.स.राळेगाव) मुख्याध्यापक मिलींद अंबलकर यांनी सांगितले.
पक्ष्यांचे अचूक टायमिंगदेश विदेशातील विविध भागातील पक्षी स्थलांतर करून हिवाळ्यात आपल्याइकडे येतात. सकाळी आपल्या उदरनिर्वाहासाठी काही पक्षी गटागटाने परिसरात आठही दिशांना प्रस्थान करतात. त्यातील काही ५ किमी तर काही २०-२५ किलोपर्यंत उड्डाण भरतात. मग विविध दिशांना व विविध अंतरावर गेलेले पक्षी एकाच वेळेस व एकाच ठिकाणी कसे एकत्र येतात हा खरं तर आपल्या मानवांसाठी उत्स्कुतेचा व संशोधनाचा विषय असल्याचे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी सांगितले.