यवतमाळ : शासनातर्फे ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासन ५ ते १२ नोव्हेंबर या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य आहे.
जगभरातील पक्ष्यांची जैवविविधता झपाट्याने कमी होत असून, अनेक पक्षी प्रजाती दुर्मीळ श्रेणीत समाविष्ट होत आहेत. राज्यातील पक्ष्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या संरक्ष्णाप्रती जबाबदारी स्पष्ट व्हावी यासाठी व्यापक जनजागृती होण्याची गरज आहे.
भारतीय पक्षीविश्व जागतिक स्तरावर पोहोचविणारे डॉ. सलीम अली व वन्यजीव अभ्यासक अरण्यऋषी मारुती चितमपल्ली या दोघांचा जन्मदिवस नोव्हेंबर महिन्यात येतो. तसेच हा महिना पक्ष्यांच्या स्थलांतराच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने ५ ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याची मागणी अनेक पक्षीप्रेमी संस्था व राज्य वन्यजीव मंडळातील सदस्यांकडून होत होती. याची दखल घेत शासनाने हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली.
सन २०१७ मध्ये राज्यात पहिल्यांदा पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी सुद्धा निसर्ग मित्र मंडळ तसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे आजीवन सभासद, संलग्नित संस्था, महाराष्ट्रात राज्यभर विखुरलेले पक्षीनिरीक्षक आणि पक्षी विषयक कार्यरत महाराष्ट्रातील संस्था हा सप्ताह विविध कार्यक्रम, पक्षी अभ्यास, निरीक्षण सहली, व्याख्याने, सादरीकरणे, असे कार्यक्रम घेऊन साजरा करत आहेत.
यानिमित्त जिल्ह्यातील टिपेश्वर अक्षयारण्य परिसरात मानद वन्यजीव रक्षक डॉ. रमझान विराणी यांनी कॅमेराबद्ध केलेले देखणे पक्षीजगत, एकदा बघाच...