रुपेश उत्तरवार
यवतमाळ : पक्षाच्या प्रचाराकरिता विविध हातखंडे वापरले जातात. यावर्षी केंद्र शासनाने सबसिडीच्या खताची विक्री करताना भाजपचा प्रचार करण्यासाठीच की काय पिशवीवरच ‘भाजप’ असे नाव अंकित केले आहे. केंद्र शासनाच्या प्रचाराच्या या नव्या पद्धतीत अनुदानित सबसिडी खताच्या पोत्यांवर कंपनीचे नाव मात्र छोट्या अक्षरात अंकित केले आहे.
दरवर्षी राज्यभरात खताची मोठ्या प्रमाणात मागणी असते. या खतावर केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. आता हे अनुदान मिळविताना खत कंपन्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने खताच्या पोत्यांवर ‘प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना’ असे ठळक अक्षराने अंकित करण्याच्या सूचना आहे. यामध्ये ‘भाजप’ हे तीन प्रमुख अक्षर एकाखाली एक येतील, अशा पद्धतीने अंकित करण्यात आले आहे.
सर्व खतांच्या पोत्यावर“भाजप’ या आद्याक्षराने सुरू होणारे ‘भारतीय जन उर्वरक परियोजना’ अंकित केल्यानंतर त्याखाली खत कंपनीचे नाव निर्देशित करण्यात आले आहे. यातून कुठलाही खर्च न करता भाजपचा प्रचार होत असल्याचे दिसून येत आहे. भाजपने यातून एकाचवेळी दोन उद्दिष्ट साध्य केले आहे.
थंब केल्यावरच सबसिडी
प्रत्येक खताच्या पोत्याची सबसिडी देताना शेतकऱ्यांचा थंब बंधनकारक करण्यात आला आहे. नंतरच खत कंपन्यांना खताचे अनुदान मिळणार आहे. याची अंमलबजावणी कठोर पद्धतीने होत असल्याने कंपन्यांना केंद्र शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करावी लागत आहे. निकष न पाळल्यास कंपन्यांच्या अनुदानावर गदा येण्याची शक्यता आहे.