सहकारात खाते उघडले : प्रथमच मोठ्या फेरबदलाचे संकेतमहागाव : कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणुकीत भाजपाने तालुक्यात सहकार क्षेत्रात प्रथमच प्रवेश केला आहे. भाजपाचे शहर अध्यक्ष सुरेश नरवाडे यांनी पक्षातून बंडखोरी करत स्वत: पॅनल तयार केले होते. त्यांनी सर्व विरोध झुगारून सहकारातील निवडणूक लढविली. यापूर्वी त्यांनी एक संचालक अविरोध आणला आहे. स्वत: व्यापारी मतदार संघातून कॉंग्रेसचे उमेदवार आणी विद्यमान संचालक स्वप्निल नाईक यांचा त्यांनी पराभव केला आहे. तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या संस्थेवर प्रथमच मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी करून बाजार समितीची निवडणुक लढवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे नाव समोर करून निवडणुका लढवण्यात येत आहेत, प्रत्यक्षात बंगल्यातून सुचवलेले चेहरे निवडणुकीत पराभूत कसे करता येतील याचेच नियोजन होताना दिसत आहे. त्याच मानसिकतेतून स्वप्निल नाईकांचा पराभव करण्यात आला असल्याची कुरकूर पक्षात सुरू झाली आहे. सर्व पक्षीय आघाडीत भाजपाचे सुरेश नरवाडे , दीपक आडे, अमर दळवे तर कांँग्रेसचे श्याम गंगाळे, विठ्ठल पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. अॅड गजेंद्र देशमुख गटाचा एक अन्य अकरा जागा राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसत असले तरी संस्थेवर वरिष्ठांनी सुचवलेला सभापती-उप सभापती पदाचा चेहरा डावलून विशिष्ट गटाच्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी पडद्याआड खलबत सुरू झाले आहे. यामध्ये नेमक्या काय घडामोडी होतात, याकडे सबंधितांचे लक्ष लागले आहे. आमदार राजेंद्र नजरधने यांच्या अध्यक्षतेखाली विजयी सभा खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, संभाजी नरवाडे, दौलत नाईक, सिताराम ठाकरे, साहेबराव पाटील कदम, यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेला तालुक्यातील सर्व नेते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे वर्चस्व
By admin | Published: February 21, 2017 1:28 AM