योगेश पडोळे
पांढरकवडा (यवतमाळ) - महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश प्राप्त केल्यानंतर भारतीय जनता पार्टी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. प्रत्येक विधानसभेतील संपर्क प्रमुखांच्या बैठकी सुरू झाल्या असून निवडणुकीच्या निकालाची आकडेमोड आणि विश्लेषणही तयार करण्यात आले आहे.
भाजपाने यंदा प्रत्येक मतदान केंद्रातील मतदार याद्यांच्या पानाचा एक प्रमुख नियुक्त केला होता. अशाप्रकारे प्रत्येक मतदान केंद्रावर पाच ते दहापेक्षा अधिक पानप्रमुख नियुक्त केले होते. त्यांच्यावर मतदारांशी संपर्क करणे, शासकीय योजनांचा लाभ मतदारांना मिळवून देणे तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारांना बाहेर काढण्याची जबाबदारी दिली होती. त्या पान प्रमुखांकडून आता प्रत्येक बुथनिहाय मतदानाची आकडेवारी गोळा करण्याचे काम संपर्क प्रमुखांच्या माध्यमाने करण्यात येत आहे. तसेच कोणत्या बुथवर भाजप अथवा शिवसेनेच्या उमेदवाराला कमी अथवा अधिक मते मिळाली, त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. अशाप्रकारे प्रत्येक मतदान केंद्र, प्रभाग, विभाग आणि विधानसभा क्षेत्राची आकडेवारी गोळा करण्यात येत आहे.
दरम्यान, चंद्रपूर येथे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा झालेला पराभव भाजपाला जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच विदर्भातील इतर विधानसभा क्षेत्रातही आता संपर्क प्रमुखांवर अधिक जबाबदारी टाकण्यात येत असून, राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती व केलेल्या कामांची माहिती मतदारांपर्यंत पोचवण्याची योजना आखण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात भाजपाकडून जोरकस अभियान छेडण्याची तयारी करण्यात येत आहे.