भाजप सरकार राज्यातील शेतकऱ्यांंना उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे, विजय वडेट्टीवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:09 PM2023-09-06T13:09:21+5:302023-09-06T13:10:31+5:30

काँग्रेसची जनसंवाद यात्रा

BJP government is committing the sin of ruining farmers in the state, criticizes Vijay Wadettiwar | भाजप सरकार राज्यातील शेतकऱ्यांंना उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे, विजय वडेट्टीवार यांची टीका

भाजप सरकार राज्यातील शेतकऱ्यांंना उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत आहे, विजय वडेट्टीवार यांची टीका

googlenewsNext

यवतमाळ : अतिवृष्टीनंतर आर्थिक साहाय्य करणार म्हणाले, ५० हजारांचा प्रोत्साहन भत्ता जाहीर करण्यात आला, त्यानंतर शेतकरी सन्मान निधीच्या बाता मारल्या. यापैकी किती जणांच्या खात्यात अनुदान पडले, असा सवाल करीत उद्योगपती मित्रांसाठी काम करणाऱ्या या सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी कसलेही घेणे-देणे नसल्याची टीका करीत भाजप सरकार राज्यातील शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त करण्याचे पाप करीत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

मंगळवारी दुपारी काँग्रेसची जनसंवाद यात्रा यवतमाळमध्ये आली. वडकी, राळेगाव, आर्णी आदी ठिकाणीही यात्रेअंतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यवतमाळ येथील कळंब चौकात यात्रेचे स्वागत करण्यात आले, तर मराठा आरक्षणासाठी संघर्ष करीत असलेल्या आंदोलकांशी वडेट्टीवार यांनी आर्णी बायपासवर संवाद साधला. त्यानंतर माळम्हसोला येथील शेतात वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेतकरी, तसेच नागरिकांशी संवाद साधला.

सोयाबीनची अवस्था वाईट आहे, कापसाचे भाव पडलेले आहेत, शेतकऱ्याला चार पैसे मिळतील असे वाटत असताना सरकारने कांदा निर्यातीवर ५० टक्के टॅक्स लावला. आता तांदळावरही २० टक्के टॅक्स लागू केला आहे. दुसरीकडे अदानी सारखे उद्योगपती मोठमोठ्या वखारी खोदून स्वस्तात शेतमाल खरेदी करणार आहेत आणि दरवाढ झाल्यानंतर हाच शेतमाल दाम दुपटीने विकणार आहेत, अशी सारी व्यवस्था मोदी सरकारने देशात उभी केली आहे. या सरकारला शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या प्रश्नाशी कसलेही देणे-घेणे नसल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

सध्या राज्यातील परिस्थिती विदारक झाली आहे, मराठा आंदोलकांवर लाठीमार होतो आहे, दुसरीकडे मागासवर्गीयांवरील अत्याचार वाढले आहेत, महिला अत्याचाराच्या प्रमाणातही भयंकर वाढ झाली आहे, अशा परिस्थितीत राज्यात सरकार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडतो, असे सांगत त्यांनी सरकारवर टीका केली.

यावेळी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आमदार वजाहत मिर्झा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, यवतमाळ काँग्रेस प्रभारी संजय राठोड, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, जावेद अन्सारी, अनिल गायकवाड, दिनेश गोगरकर, चंद्रशेखर चौधरी, प्रदीप साळवे, संजय भोयर, नारायण राठोड, सरपंच उमेश चव्हाण, ओम तिवारी आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भाजपने घेतला ‘इंडिया’चा धसका

महाराष्ट्रासह देशात भाजपविरोधात इंडिया आघाडी आकाराला येत आहे. या आघाडीची एकजूट पाहून भाजपने धसका घेतल्याचे सांगत त्यामुळेच इंडियाऐवजी भारत असे गॅझेटमध्ये नाव बदलल्याची टीका विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी केली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला २०० पेक्षा कमी जागा मिळतील, असे सर्व्हे येत असून पुढील काळात कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास भाजपची आणखी घसरण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आदेश कोणी दिले; नार्को टेस्ट करा

जालना जिल्ह्यात शांततामय मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपण लाठीमार करण्याचे आदेश दिले नव्हते, असे म्हटले आहे. आदेश नव्हते, तर एसपींनी लाठीचार्ज कसा केला या प्रकरणात दुय्यम अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मग हीच कारवाई एसपींवर का करीत नाही, असा सवाल करीत सर्वांचीच नार्को टेस्ट करावी, म्हणजे कोणी आदेश दिले हे पुढे येईल, असे ते म्हणाले.

Web Title: BJP government is committing the sin of ruining farmers in the state, criticizes Vijay Wadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.