पत्रपरिषद : स्वतंत्र विदर्भासाठी खासदारांना राजीनामे मागणारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजपाने सत्तेवर येण्यापूर्वी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर त्यांना या आश्वासनाचा विसर पडल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला. सरकारच्या या धोरणाविरूद्ध ९ आॅगस्टपासून ‘भाजपा सरकार चले जाव’ आंदोलन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार आंदोलन राबविले जाणार असून या आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणून खासदारांना राजीनामा मागितला जाणार आहे. ९ आॅगस्टला नागपूर येथील गडकरी वाड्यावरून या आंदोलनाची सुरूवात होईल. त्यात पहिला राजीनामा केंद्रीय मंत्री असलेल्या खासदार नितीन गडकरींचा मागितला जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. उत्पादन खर्च आणि ५० टक्के दरानुसार शेतमालाचे दर द्यावे. वीज भारनियमन बंद करावे. विदर्भात निम्म्या दरात वीज मिळावी. यासह विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन असल्याचे आंदोलनाचे प्रमुख माजी आमदार अॅड. वामनराव चटप, प्रा. पुरूषोत्तम पाटील, रंजना मामर्डे, कृष्णराव भोंगाडे, प्रदीप धामणकर, विजय चाफले, किशोर परडखे, दिलीप उमरे, इंदरचंद बैद, नारायण बोरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘भाजपा सरकार चले जाव’ आंदोलन
By admin | Published: July 10, 2017 1:04 AM