यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर-आर्णी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजू तोडसाम यांच्या दुसऱ्या पत्नीने पहिल्या पत्नीविरुद्ध मंगळवारी (१२ मार्च) अपर पोलीस अधीक्षक अमरसिंग जाधव यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. त्यात त्यांनी धिंड काढणे, विनयभंग यासह अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे.
अपर पोलीस अधीक्षकांना तक्रार वजा निवेदन सादर केल्यानंतर आमदाराच्या दुसऱ्या पत्नीने येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांची पत्नी अर्चना येडमे-तोडसाम, पांढरकवडाच्या पंचायत समिती सदस्य शीला गेडाम, मनीष रामगीरवार, गणेश घोडाम, नागोराव गेडाम, अक्षय नवाडे, आकाश उर्फ मोनू कनाके, रुपेश चौधरी, महेंद्र कर्णेवार, रणजित चव्हाण यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पांढरकवडा शहरात १२ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे म्हटले आहे. उपरोक्त व्यक्तींनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केला, लाथाबुक्क्यांनी तसेच चपलेने मारहाण केली, त्याची व्हिडीओ चित्रफित बनवून सर्वत्र व्हायरल केली, गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने, मोबाईल जबरीने हिसकावून विनयभंग केला, सार्वजनिकरीत्या धिंड काढली आदी आरोप करण्यात आला आहेत. यासंबंधीची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यातही नोंदविण्यात आली. सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मोदींच्या सभेमुळे रोखले
मारहाणीच्या उपरोक्त घटनेची फिर्याद पांढरकवडा पोलिसांत देणार होते, मात्र माझे पती आमदार राजू तोडसाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १६ फेब्रुवारीला सभा असल्याने या सभेनंतर तक्रार देऊ असे सांगितले. त्यामुळे मी गप्प बसली. मात्र नंतर मलाच तक्रार दिल्यास अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली गेल्याचे आमदाराच्या दुसऱ्या पत्नीने पत्रकारांना सांगितले.