काँग्रेसमध्ये पिता-पुत्राचा दावा : अहीरांचा शब्द निर्णायक, पाठिराखा गेल्याने धुर्वेंची कोंडीराजेश निस्ताने - यवतमाळ आर्णी-केळापूर या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित विधानसभा मतदारसंघात भाजपामध्येच उमेदवारीची सर्वाधिक चुरस आहे. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांचा हा मतदारसंघ. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी यावेळी त्यांचा मुलगा जितेंद्र मोघे यांचेही नाव चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे हंसराज अहीर यांना तब्बल ५९ हजार ८१४ मतांची आघाडी मिळाल्याने काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. भाजपाकडून प्रामुख्याने मिलिंद धुर्वे, संदीप धुर्वे, उद्धवराव येरमे, शामकांत झळके, राजू तोडसाम आदी नावांची चर्चा आहे. या मतदारसंघावर शिवसेनेनेही दावा सांगितला असून एका महिला जिल्हा परिषद सदस्याचे पती वर्षभरापासून कामाला लागले आहे. खासदार हंसराज अहीर यांच्या शब्दावर भाजपाचा उमेदवार ठरणार, एवढे निश्चित. राळेगावसाठी चर्चेत असलेले जिल्हा परिषद सदस्य मिलिंद धुर्वे यांचे नाव आर्णी-केळापूरसाठी एका नेत्याकडून रेटले जात आहे. माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे हेसुद्धा गोपीनाथ मुंडेंच्या पाठबळावर प्रयत्नात होते. मात्र त्यांची आता कोंडी झाली आहे. गतवेळचे उमेदवार उत्तमराव इंगळे यांनीे यावेळी किनवटवर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभेतील आर्णी विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख शामकांत झळकेसुद्धा भाजपाकडून जोर लावून आहे. लोकसभेत पराभव झाल्यानंतर शिवाजीराव मोघे जमिनीवर आले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात मुलासोबत पुन्हा सामान्य मतदारांच्या भेटीगाठी, आढावा बैठकी सुरू केल्या आहेत. त्यांचा मुलगा मतदारसंघात भावी उमेदवार म्हणून फिरत असला तरी त्याला मतदार आणि काँग्रेस पक्षातील जेष्ठ पदाधिकारी-कार्यकर्ते कितपत स्वीकारतात यावर पुढचे गणित अवलंबून आहे. अहिरांना लोकसभेत जेवढा मतांचा लिड (५९ हजार) मिळाला तेवढाच लिड आम्हाला विधानसभेत पाहून घ्या, असा दावा मुलाकडून जाहीररीत्या केला जात असल्याने मोघेंनी लोकसभेत नेमके कुणाचे काम केले, असा संभ्रम निर्माण झाला आहे. मोघेंबाबत असलेली नाराजी मतदारांनी लोकसभेत दाखवून दिली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काँग्रेस सावधानी बाळगत आहे. भाजपामध्ये उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत असली तरी त्यातील बहुतांश उमेदवार हे मतदारसंघाबाहेरील आहेत. त्यामुळेच कार्यकर्त्यांनी स्थानिक उमेदवारावर जोर दिला आहे. सतत पक्षबदल करून स्वत:ची किंमत वाढवून घेणाऱ्या नेत्याला यावेळी पक्षाने किंमत देऊ नये, असा भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सूर आहे. प्रत्येक वेळी हा नेता कुणाच्याही विजयाचे श्रेय आपल्याकडे खेचून घेतो अशी ओरड आहे. आर्णी-केळापूर मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारीसाठी खासदार हंसराज अहीर कुणाच्या पारड्यात वजन टाकतात यावर सर्व खेळ अवलंबून आहे. भाजपातून दोघांनी बंडखोरीचीही तयारी चालविली आहे. भाजपाकडून सन्मान मिळत नसल्याने शिवसेनेत नाराजी आहे. या मतदार संघातील राष्ट्रवादीचा गट काँग्रेसवर आणि विशेषत: मोघेंवर नाराज आहे. या नाराजीतूनच अहिरांच्या मतांचा आकडा वाढल्याचे बोलले जाते.
भाजपातच उमेदवारीसाठी रस्सीखेच
By admin | Published: June 11, 2014 11:36 PM