विधानसभा : दिल्ली, मुंबईची चार पथके येणार यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या मतदारसंघात कोण सक्षम उमेदवार ठरू शकतो याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. आतापर्यंत केवळ राज्यस्तरावर हे सर्वेक्षण केले जात होते. यावेळी मात्र केंद्रस्तरावरूनही दोन वेगवेगळ्या चमूंमार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. केंद्रात एकहाती सत्ता मिळविल्यानंतर भाजपाने आता राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अधिकाधिक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असावी, असा प्रयत्न आहे. त्यातही २0१४ मध्ये निवडणुका होणार्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांवर भर दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीत जनतेचे मत कोणत्या उमेदवाराबाबत चांगले आहे, कोण निवडून येऊ शकतो, याबाबत सर्वेक्षण केले जाते. आतापर्यंत प्रदेश भाजपाकडून दोन वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमार्फत हे सर्वेक्षण केले जात होते. त्यातील निष्कर्ष आधार मानून उमेदवारी दिली जात होती. परंतु अनेकदा नेत्यांनी आपल्या सोईच्या उमेदवारासाठी हे सर्वेक्षणही सोईने करून घेतल्याचा आरोप केला गेला. त्यामुळे खुद्द इच्छुक उमेदवारांनाच या सर्वेक्षणावर तेवढा विश्वास नाही. त्यामुळेच यावेळी राज्यासोबतच केंद्र शासनानेही आपल्या स्तरावरून महाराष्ट्रातील भाजपाच्या वाट्याला असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघात दोन एनजीओमार्फत स्वतंत्र सर्वेक्षण करावे, अशी मागणी रेटली गेली. (जिल्हा प्रतिनिधी)
उमेदवारीसाठी भाजपाचे सर्वेक्षण
By admin | Published: June 09, 2014 11:50 PM