यवतमाळ : काॅंग्रेसने यवतमाळसह राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेऊन लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असतानाच भाजपही लोकसभेच्या तयारीला लागला आहे. गुरुवारी भाजपने यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या निवडणूक प्रमुखासह सात विधानसभा मतदारसंघांची जबाबदारीही पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर दिल्याने आगामी काळात निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
राज्यातील वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल असल्याचे सांगत काॅंग्रेसने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांचा नुकताच आढावा घेतला. या बैठकीत काॅंग्रेस नेत्यांनी स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांची मते आजमावून घेतली. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांचे दौरे करणार असल्याचे काॅंग्रेस नेत्यांनी जाहीर केले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काॅंग्रेस, राष्ट्रवादी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यामुळे काॅंग्रेसच्या या आढावा बैठकीला महत्त्व होते. काॅंग्रेसच्या या आढावा बैठकीप्रमाणेच राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडूनही अंतर्गत पक्षीय आढावा घेतला जात असून, त्यानंतर हे तीनही पक्ष जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतरच महाविकास आघाडीत एकजूट आहे की नाही, हे पुढे येणार आहे.
दुसरीकडे भाजपची निवडणूक तयारी सुरूच आहे. पक्षीय पातळीवर विविध कार्यक्रम घेत कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सक्रिय करण्याचे काम भाजपने केले आहे. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रमुखांची जबाबदारी खांद्यावर देऊन पक्ष थेट निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. भाजपने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखाची धुरा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांच्या खांद्यावर सोपविली आहे. दुसरीकडे हिंगोली लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी रामराव वडकुते यांच्याकडे देण्यात आली आहे. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून प्रमोद कडू हे काम पाहणार आहेत.
विधानसभा मतदारसंघाची या शिलेदारांकडे जबाबदारी
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने गुरुवारी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघांसाठी निवडणूक प्रमुख घोषित केले. वणी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संजय पिंपळशेंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या राळेगाव विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सतीश मानलवार यांच्याकडे, यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी बाळासाहेब शिंदे, दिग्रस विधानसभेसाठी महादेव सुपारे, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या आर्णी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी नरेंद्र नारलावार, पुसद विधानसभेची जबाबदारी आमदार निलय नाईक तर अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरखेड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आरती फुपाटे यांच्याकडे असणार आहे.