जिल्हा परिषद गटनेते : पावडे, देवसरकरांची वर्णी यवतमाळ : जिल्हा परिषदेतील भाजपाच्या गटनेतेपदी मंगला पावडे, तर काँग्रेसच्या गटनेतेपदी राम देवसरकर यांची निवड झाली. भाजपाने महिलेला संधी दिली, तर काँग्रेसने ११ मधील नऊ महिलांना डावलून पुरुषाला संधी दिली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत पक्षांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. दरम्यान, भाजपाने शनिवारी येथील भावे मंगल कार्यालयात गटनेता निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेतली. बैठकीत सर्वानुमते जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मंगल पावडे यांची गटनेते म्हणून निवड केली. संघाच्या मुशीतील पावडे यांची गटनेतेपदी निवड झाल्याने जिल्हा परिषदेतील सदस्यांवर संघाचा वॉच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. मंगला पावडे वणी तालुक्यातील घोन्सा-कायर गटातून निवडून आल्या आहेत. या बैठकीला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी उपस्थित होते. काँग्रेसच्या गटनेतेपदी उमरखेड तालुक्यातील विडूळ-चातारी गटातून विजयी झालेले राम देवसरकर यांची निवड झाली. यासाठी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात शनिवारी बैठक झाली. या बैठकीला सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पराभूत उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते. त्यात सर्वानुमते राम देवसरकर यांची निवड झाली. या बैठकीला विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, पक्ष निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे आणि प्रा. वसंतराव पुरके, माजी आमदार विजयराव खडसे, मोहम्मद नदीम, राहुल ठाकरे आदी उपस्थित होते. बैठकीत काँग्रेस नेत्यांनी पराभवाची कारणमिमांसाही केली. (शहर प्रतिनिधी) नेमकी सत्ता कुणाची ?, गूढ कायम जिल्हा परिषदेत नेमका कोणता पक्ष सत्ता स्थापन करणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेचा दावा मजबूत आहे. मात्र शिवसेना सत्ता स्थापनेसाठी कुणाची मदत घेणार, हाच खरा प्रश्न आहे. शिवसेना व राष्ट्रवादीने गटनेत्यांची नोंदणी करण्यासाठी एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतल्याने भुवया उंचावल्या आहे.
भाजपची महिलेला संधी, काँग्रेसने मात्र डावलले
By admin | Published: March 12, 2017 12:48 AM