पुसद/महागाव (यवतमाळ) : विदर्भात मोठ्या प्रमाणात बनावट खत, बियाण्यांचा काळाबाजार एका कंपनीमार्फत सुरू असल्याची माहिती समोर आली. या साखळीमधील एक कडी शेतकऱ्यांमार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांच्या हाती लागली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथे मोर्शी रोडवरील माहुली (जहांगीर) या ठिकाणी कंपनीच्या गोदामावर धाड टाकून बनावट कृषीमाल जप्त करण्यात आला.
पुसद येथे हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला कृषिमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी उपस्थित होते. त्यावेळी पोहरादेवी, दिग्रस, वाशिम, पुसद, महागाव व अन्य परिसरामध्ये अमरावती येथील बनावट कंपनीद्वारे थेट शेतकऱ्यांना खत आणि बनावट बियाणे दिले जात असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना मिळाली. कृषी मंत्र्याचा दौरा असताना ही कार्यवाही करण्यासाठी मंत्र्यांच्या परवानगीनंतर त्यांनी महागाव तालुक्यातील सारखणी परिसरात बनावट खत आणि बियाण्यांची थैली जप्त केली.
ज्या शेतकऱ्यांकडून या बनावट खत बियाण्यांची माहिती मिळाली, त्या माहितीच्या आधारे अमरावती कृषी आयुक्त कार्यालयाला अवगत करण्यात आले. माहितीनुसार त्यांनी मोर्शी रस्त्यावरील माहुली (जहांगीर) येथील बनावट कारखान्यावर धाड टाकली. त्यात ४३०० बॅग बनावट खत, १५०० लिटर पीजीआरचा साठा जप्त केला. स्वरूप मोठे असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत अमरावती येथील कृषी अधिकाऱ्यांमार्फत कारवाई सुरू आहे.
बोगस खताची विक्री करणारी टोळी
पुसद तालुक्यातील काटखेडा ते कातरवाडी या भागात फिरून १०० रुपयांना एक खताची बॅग करणारी टोळी सक्रिय झाली होती. माहिती मिळताच कृषी अधिकाऱ्यांनी धाड टाकून १७ ऑगस्टला कारवाई केली होती. अमरावती येथील मोर्शी रोडवरील खताच्या गोदामातून हा खताचा पुरवठा होत होता. शुक्रवारी तेथेच धाड टाकून जवळपास ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी कल्याण पाटील, कृषी अधिकारी पंकज बरडे आदींच्या मार्गदर्शनात पुसद तालुक्यात कारवाई करण्यात आली.
अमरावती येथील बनावट कंपनीद्वारे खत आणि औषध बियाणे थेट शेतकऱ्यांपर्यंत जाऊन विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे महागाव तालुक्यातील सारखणी भागामध्ये शेतकऱ्याकडे विचारपूस केली. बनावट खताची बॅग मिळून आली. ती जप्त केली. हे बनावट कृषी साहित्य नेमके कुठून येत आहे, त्याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही अमरावती कृषी आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आली. त्यात ४३०० बॅग बनावट खत आणि १५०० लिटर पीजीआरएस जप्त केले. सदर कंपनीकडे कुठलाही परवाना आढळला नाही. पुढील कार्यवाही अमरावती कृषी आयुक्त कार्यालय करीत आहे.
राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ