मैनेसारखा देखणा : राजस्थान, गुजरातमध्ये वास्तव्य स्थानिक प्रतिनिधी। लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : सातपुड्याच्या पर्वत रांगा वगळता महाराष्ट्रात फारच कमी आढळणारा काळा कस्तुरी हा अत्यंत देखणा पक्षी सध्या यवतमाळ शहराच्या अवतीभवती घिरट्या घालत आहे. पक्षीनिरीक्षकांनी बहिरमच्या जंगलात नुकतीच त्याची नोंदही घेतली आहे. शहरालगतच्या जाम रोडवरील बहिरम जंगलात सध्या काळ्या कस्तुरीचा मुक्त विहार आहे. अमोलकचंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्राचे प्राध्यापक डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांनी त्याचे सुंदर छायाचित्रही टीपले आहे. युरेशियन ब्लॅक बर्ड असे इंग्रजी नाव असलेला हा पक्षी मध्यम आकाराचा मैनेएवढा आहे. पिवळी चोच, डोळ्याभोवती पिवळसर रिंग यामुळे तो अत्यंत देखणा दिसतो. भारतातल्या भारतात तो कमी अंतरावर स्थलांतर करतो. राजस्थान, गुजरात, दक्षीण-पश्चिम घाट, तामीळनाडूतील कार्डमम्च्या डोंगररांगा आदी ठिकाणी तो हिवाळी पाहुणा म्हणून वास्तव्यास असतो. महाराष्ट्रात मेळघाटच्या सातपुड्याच्या रांगा वगळता हा काळा कस्तुरी फारसा दिसत नाही. त्यामुळेच यवतमाळच्या जंगलातील त्याची नोंद महत्त्वाची असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. याच दरम्यान काळ्या कस्तुरीची नोंद नागपुरातील अंबाझरी तलाव, वर्धा येथेही झाली. त्यामुळे हे पक्षी विदर्भातून मोठ्या प्रमाणात मार्गस्थ होत असल्याचे मत डॉ. दाभेरे यांनी व्यक्त केले.
बहिरमच्या जंगलात काळा कस्तुरी
By admin | Published: May 06, 2017 12:19 AM