दतात्रय देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : एकीकडे विदर्भातील शेतकरी घटणाऱ्या उत्पन्नामुळे आत्महत्येसारखा घातक मार्ग पत्करत आहेत. तर दुसरीकडे याच विदर्भातील अनेक शेतकरी उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयोगही करीत आहेत. असा एक प्रयोग उमरखेड तालुक्यातील चातारी शेतशिवारात करण्यात आला आहे. काळ्या गव्हाचा हा प्रयोग केला आहे. भाऊराव धात्रक नामक शेतकऱ्याने. सध्या बहरात आलेला हा गहू पाहण्यासाठी विदर्भ मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी चातारी शिवारात धाव घेतली आहे.
चातारी येथील शेतकरी भाऊराव धात्रक हे याअगोदर राज्यात विविध ठिकाणी तालुका कृषी विभागामार्फत पीक पाहणी अभ्यास दौऱ्यात नेहमीच अग्रेसर राहिले. शेतकर्यांनी रासायनिक खत टाळून शेत जमिनीचा पोत कायम राहाण्यासाठी गांडूळ खत उत्पादित करून शेतीला सेंद्रिय खताची जोड द्यावी, असे त्यांचे मत आहे. त्याच दृष्टिकोनातून भाऊराव धात्रक यांनी प्रथमच काळ्या गव्हाच्या वाणाची प्रायोगिक तत्त्वावर एक एकरात पेरणी केली.
पीक जसजसे वर येऊ लागले तसतसे अन्य शेतकऱ्यांमध्ये या पिकाविषयी उत्सुकता वाढली. हा गहू मानवी शरीराला कितपत उपयोगी आहे, याविषयी इतर शेतकरी धात्रक यांच्याकडे येऊ लागले. हा गहू आपणास मिळावा म्हणून काही जणांनी मागणी करून ठेवली आहे. या वाणाचा गहू एकरी १५ ते ३५ क्विंटल उत्पादित होऊ शकतो, असे भाऊराव धात्रक सांगतात.
वाढत्या खर्चाने शेतकरी खचले आहेत. परंतु, शेती साेडून देता येत नाही. त्यावरच संसाराचा गाडा अवलंबून आहे. म्हणून मी पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून वेगवेगळे वाण पेरणी करतोय. प्रथमच काळ्या गव्हाचे वाण घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
- भाऊराव धात्रक, शेतकरी, चातारी