लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : २१ आॅगस्टचा पोळा आणि २२ आॅगस्टची कर डोळ्यापुढे ठेऊन गावागावात गावठी दारूच्या भट्ट्या पेटल्या आहेत. आतापासूनच दारूचा साठा करून ठेवला जात आहे. ही दारू विविध ठिकाणी चोर मार्गाने पाठविली जात आहे. महागाव पोलिसांनी अशाच एका गावठी दारू निर्मिती अड्ड्याचा गुरुवारी पर्दाफाश करून १६६ पिंपे दारू जप्त केली.पोळा सणाचा ग्रामीण भागाशी थेट संबंध आहे. पोळ्यासाठी बळीराजाकडून जोरदार तयारी केली जाते. या पोळा सणाचा आडोसा घेऊन काही मंडळी आपली वेगळी तयारीही चालवितात. पोळ्याच्या दुसºया दिवशी कर साजरी केली जाते. ही कर म्हणजे पार्टीची जणू पर्वणीच असते. या करीचे शौकिनांना वेध लागतात. या तयारीचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गावठी दारूची निर्मिती केली जात आहे. अनेक गावांमध्ये नदी-नाल्याच्या काठावर दारुच्या भट्ट्या पेटल्या आहेत. मोठ्या प्रमाणात दारूची निर्मिती करून साठा केला जात आहे. ऐन पोळ्याच्या वेळी पोलीस रस्त्यावर राहण्याच्या भीतीने आतापासूनच मागणी असलेल्या ठिकाणी गावठी दारूचा पुरवठा केला जात आहे. महागाव पोलिसांनी गुरुवारी केलेल्या एका कारवाईने ही बाब सिद्ध झाली आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पोळ्याच्या निमित्ताने पेटलेल्या गावठी दारूच्या भट्ट्या विझविण्याचे आव्हान जिल्हाभरातील पोलीस यंत्रणा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागापुढे आहे.फुलसावंगीत पावणेदोन लाखांची दारू जप्तफुलसावंगी : महागाव पोलिसांनी फुलसावंगी येथे पैनगंगा नदीच्या काठावर धाड घालून गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त केली. तेथून चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १६६ पिंपे दारू, मोहामाच व साहित्य असा पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महागावचे ठाणेदार करीम मिर्झा यांच्या नेतृत्वात फौजदार दोनकलवार, गोटे, पोलीस कर्मचारी सुनील राठोड, माणिक पवार, सुरेश पवार, मोहसीन, प्रशांत थुल, प्रमोद पवार, समीर आदींनी ही कारवाई केली.
पोळ्यासाठी पेटल्या दारू भट्ट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 10:02 PM
२१ आॅगस्टचा पोळा आणि २२ आॅगस्टची कर डोळ्यापुढे ठेऊन गावागावात गावठी दारूच्या भट्ट्या पेटल्या आहेत.
ठळक मुद्देपोलीस-एक्साईज पुढे आव्हान : दहा दिवसांपूर्वीच साठा