यवतमाळ : दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आशीर्वाद समारोह येथील यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनाही निमंत्रित करण्यात आले होते. प्रसंगी विद्यार्थ्यांनी हातात मेणबत्ती घेऊन प्रामाणिकतेसोबतच नावलौकिक करण्याची शपथ घेतली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, शाळा समितीचे सदस्य प्राचार्य शंकरराव सांगळे, माणिकराव भोयर, अमरचंद दर्डा आदी उपस्थित होते. सरस्वतीपूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. विशाल शेंदरकर व चमुने सरस्वती वंदना सादर केली. यावेळी पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्मार्ट फोनच्या दुष्परिणामापासून सावध राहण्याचे आवाहन केले. पालकांनीही परीक्षा काळात आपल्या पाल्यांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी समायोचित मार्गदर्शन केले. समन्वयक रुखसाना बॉम्बेवाला यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांतर्फे आर्यन सोधी, वेदश्री घोटकर यांनी तर पालकांतर्फे डॉ. काबरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसंगी प्रभारी प्राचार्य अर्चना कढव यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकता आणि नावलौकिकतेची शपथ दिली. विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. संचालन दिनेश जयस्वाल यांनी तर आभार अमोल चन्नुरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक अजय सातपुते, दिनेश जयस्वाल, संध्या सुब्रह्मण्यम आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये आशीर्वाद समारोह
By admin | Published: February 28, 2017 1:25 AM