आॅनलाईन लोकमतपुसद : रेती तस्करीवरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून खून केल्याची घटना तालुक्यातील जांबबाजार येथे घडली. शुक्रवारी रात्री झालेल्या हाणामारीतील या तरुणाचा सोमवारी मृत्यू झाल्याने गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी ३७ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.सुरेश परशराम चव्हाण (२६) रा. जांबबाजार असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, विश्वास काशीनाथ राठोड हा शुक्रवारी सायंकाळी आपल्या घरी बसला होता. त्यावेळी आरोपी शेख राजीक शेख इस्माईल व इतर तीन जण त्यांच्या घरी आले. आम्ही रेती आणतो, त्या ठिकाणच्या शेतमालक पंजाब राठोड रा. जमशेटपूर यांना का माहिती दिली, यावरून वाद घातला. त्यावेळी नातेवाईकांनी समजूत काढून सर्वांना परत पाठविले. मात्र त्याच रात्री ८ वाजताच्या सुमारास शेख राजीकसह ३७ जण हातात दगड, लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉड घेऊन विश्वास राठोड यांच्या घरावर चालून गेले. त्यावेळी सुरेश परशराम चव्हाण मध्यस्थी करण्यासाठी तेथे गेला. त्यावेळी आरोपींनी सुरेशच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला पुसद व नंतर वर्धा येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी ३७ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला होता.वर्धा येथे उपचार घेत असलेल्या सुरेशचा सोमवारी मृत्यू झाला. याची माहिती गावात येताच प्रचंड तणाव निर्माण झाला. पुसद ग्रामीणचे ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला. उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे. या प्रकरणातील आरोपी शेख आशिक शेख राजीक (१८) याला पोलिसांनी अटक केली. यानंतर उशिरा रात्री आणखी आठ जणांना अटक करण्यात आली. सुरेश चव्हाण या तरुणाचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याला आई-वडील नाहीत. दोन भाऊ आहे. वादात मध्यस्थी करणे त्याच्या जीवावर बेतले. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात भेट देऊन आढावा घेतला. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाºयांना मार्गदर्शन केले.मृतदेहासह पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यावर धडकवर्धेवरुन सुरेश चव्हाणचा मृतदेह घेऊन संतप्त नातेवाईक थेट पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात धडकले. या ठिकाणी जांबबाजारवरूनही २०० ते २५० नागरिक पोहोचले. तोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यावेळी सहायक पोलीस अधीक्षक अजय बन्सल, शहर ठाणेदार अनिलसिंह गौतम, ठाणेदार प्रकाश शेळके यांनी समजूत काढली. त्यानंतर बंदोबस्तात मृतदेह जांबबाजारकडे रवाना झाला.
वादात मध्यस्थी करणाऱ्याचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:15 AM
रेती तस्करीवरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून खून केल्याची घटना तालुक्यातील जांबबाजार येथे घडली.
ठळक मुद्देजांबबाजार येथे तणाव : ३७ जणांविरुद्ध गुन्हा, अपर अधीक्षकांची भेट