लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची २ जुलै रोजी जयंती आहे. त्याप्रित्यर्थ ‘लोकमत’च्यावतीने जिल्ह्यात २ ते ११ जुलै या कालावधीत सकाळी १० ते ३ या वेळेत जिल्ह्यातील १६ तालुक्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी २ जुलै रोजी यवतमाळ आणि बाभूळगाव येथून होत आहे. या शिबिरात जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यवतमाळ येथील दर्डा मातोश्री सभागृह, दर्डानगर येथे सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या महारक्तदान शिबिरास प्रारंभ होईल तर बाभूळगाव येथे ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिर सुरू होणार आहे. कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थायलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह, अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शाेधणे व त्याचा रक्त गट जुळविणे हे अतिशय जिकरीचे काम आहे, या सर्वांना जीवनदान देण्यासाठी खऱ्या दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान अर्पण करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डाॅक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्यावतीने हा उपक्रम आयोजित केला आहे.