यवतमाळ : चंद्रपूर जिल्ह्यातील भटाळा येथील महाशिवरात्रीची यात्रा करून परतत असताना तीन युवक वणी-वरोरा लगतच्या पाटाळा येथील वर्धा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असता तिघेही नदीत बुडाले. शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेनंतर प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेतली. अखेर शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास तिघांपैकी दोन जणांचे मृतदेहच हाती लागले. प्रशासनाकडून बुडालेल्या एकाचा शोध घेण्यात येत आहे.
संकेत पुंडलिक नगराळे (२७), अनिरुद्ध चाफले (२२) आणि हर्ष चाफले (१६) अशी वर्धा नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. यातील संकेत पुंडलिक नगराळे व अनिरुद्ध चाफले या दोघांचे मृतदेह शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास हाती लागले. तर हर्ष चाफले याचा शोध घेण्यात येत आहे. वणी येथील पोलिस पथकासह माजरी (जि.चंद्रपूर) येथील पोलिसांचे पथक कालपासूनच घटनास्थळी आहे. तहसीलदार निखील धुळकर, वणीचे ठाणेदार अनिल बेहराणी यांच्या नेतृत्वाखाली हर्ष चाफले या तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.