कारवाईची मागणी : गोरगरीब ग्रामीण जनतेची होत आहे लुबाडणूक बोरीअरब : दारव्हा तालुक्यातील बोरीअरब परिसरात बोगस डॉक्टरांनी थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गोष्टीची दखल घेत बोरीअरब येथील खासगी डॉक्टर असोसिएशनने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील बोगस डॉक्टरांची यादी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे सादर करून कारवाईची मागणी केली आहे. बोरीअरब व परिसरातील अनेक गावांमध्ये कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना अनेकांनी रुग्णालय थाटले आहे. तर काहीजण घरोघरी जावून रुग्ण तपासतात. गावखेड्यातील गोरगरीब लोकांवर वैद्यकीय उपचार करून आपली दुकानदारी चालवितात. यामध्ये नागरिकांची लुबाडणूक होत असून त्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. यापूर्वीसुद्धा बोरीअरब येथे गावकऱ्यांनी परप्रांतातील बोगस डॉक्टरला पकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत लाडखेड पोलिसांच्या स्वाधीन केले होते. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच नंतर सदर बोगस डॉक्टरला सोडून दिले होते. बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश असताना बोरीअरब केंद्राचे वैद्यकीय अधिकारी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यामध्ये हयगय करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. परिसरातील राजीवनगर, वडगाव गाढवे, चाणी, सारंगपूर, दहीफळ, जवळगाव, दूधगाव व सावळा आदी गावात सद्यस्थितीत सहा बोगस डॉक्टर द्वारपोच सेवा रुग्णांना देत असल्याचे उघडकीस आले आहे. अशा डॉक्टरांवर त्वरित कठोर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे आता परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
बोगस डॉक्टरांची यादीच केली सादर
By admin | Published: February 06, 2017 12:28 AM