यवमाळ : मोठ्या प्रमाणात प्रतिबंधीत बोगस बिटी बियाणे विक्रीसाठी आणले जात आहे. यवतमाळातून अकोलाबाजारमार्गे दोन युवक बियाणे घेऊन जात असल्याची माहिती पंचायत समिती तालुका कृषी अधिकार राजेंद्र घोंगडे यांना मिळाली. त्यांनी सहका-यांच्या मदतीने चापडोह चौफुलीवर सापळा रचून दुचाकीस्वार दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल १५० बॅग बोगस बियाणे जप्त केले. ही कारवाई शनिवारी सकाळी ९.३० वाजता केली.
पंकज भोयर (२९) रा. वैद्यनगर, अविनाश राठोड (२४) रा. वडगाव रोड, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हे दोघे दुचाकीने (क्र.एम.एच.२९-ए.एस.६८१२) अकोलाबाजारकडे जात होते. दुचाकीवरून प्रतिबंधीत बियाणे विक्रीसाठी जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून कृषी अधिकारी राजेंद्र घोंगडे यांनी सापळा रचला. मोहीम अधिकारी पंकज बरडे, जिल्हा गुणवत्ता निरीक्षण अधिकारी नितेश येळवे यांनी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कैलास वानखडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई पार पाडली. यात अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील जमादार सुरेश मेश्राम, संजय राठोड यांची मदत घेण्यात आली.
आरोपींनी बोगस बिटी बियाणे वर्धा येथून आणल्याची क बुली दिली. त्यांच्याजवळून जप्त केलेल्या बियाण्यांमध्ये ‘बीगबोल-२ रिकॉट-६’ याच्या १०० बॅग, तर कावेरी सिड्सची डुप्लीकेट ‘एटीएम’ च्या ५० बॅग जप्त केल्या. हर्बीसाईड टॉलरन्स असलेली ही बीटी आहे. हे बियाणे लागवड केलेल्या शेतात ग्लायकोसेड हे तणनाशक फवारणी करता येते. यामुळे इतर पिकांवर विपरित परिणराम होतो. शिवाय पर्यावरणाचीही मोठी हानी होते. ग्यालकोसेड फवारणी केलेल्या शेतात पुढील हंगामात गहू व इतर कोणतेही धान्य पीक घेतल्यास कर्करोगाचा धोका दुप्पटीने वाढतो. अशा बियाण्यावर देशात बंदी आहे. त्यानंतरही त्याचा चोरटा व्यापार जोरात सुरू आहे. याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी घोंगडे यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, बियाणे कायदा १९६६ मधील कलम ७ ते १४, जीवनाश्यक वस्तू कायदा आणि आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यापूर्वी घाटंजी येथे बोगस बियाण्याचा मोठा साठा सापडला होता.