पुन्हा संकट : महागाव तालुक्यात १८ हजार हेक्टरला धोका
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : यंदा बियाणे खरेदीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कधी गारपीट, कधी खोडकीड़, तर कधी लाल्यामुळे शेतकरी हादरून आहे. आता गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
पुसदचे उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, तालुका कृषी आधिकारी विजय मुकाडे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन भेटी दिल्या. त्यांनी पिकांची पाहणी केली. त्यात तालुक्यात दरवर्षीपेक्षा कपाशी लागवडीत घट झाल्याचे दिसून आले. यंदा तालुक्यात १८ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. या संपूर्ण क्षेत्राची पाहणी केल्याशिवाय बोंड अळीने नेमके किती क्षेत्र बाधित झाले, हे सांगणे सध्या अवघड असल्याचे मुकाडे यांनी सांगितले.
बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १५ ऑगस्टला कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन पालकमंत्री संदीपान भुमरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी बोंडअळीसंदर्भात चर्चा केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दहा हजार सुरक्षा फवारणी किट देण्याचे आश्वासन दिले. फेरोमोनट्रॅपसुद्धा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी सांगितले.
बॉक्स
कोरोनाप्रमाणे बोंडअळीची लाट
शिरपूर येथील शेतकरी राजू पाटील यांनी यंदा पाच एकरात कपाशीची लागवड केली. त्यांनी कोरोनाप्रमाणे दोन वर्षांपासून बोंडअळीची लाट येत असल्याचे सांगितले. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीची पहिली लाट आम्ही झेलली. मात्र, आता बोंडअळीच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले असून कृषी शास्त्रज्ञांनी कायमस्वरूपी उपाय शोधून काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कोटबोंडअळी सध्या आर्थिक नुकसानीच्या पातळी खाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कामगंध सापळे लावावे. निंबोळी घटक असलेल्या कीटकनाशक औषधींची फवारणी करावी.
डॉ. प्रमोद यादगिरवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ