मारेगाव तालुक्यात ५७ ग्रामपंचायती आहेत. मात्र सद्य:स्थितीत तालुक्यात २८ ग्रामसेवक व तीन ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत. यातच जुलै महिन्यामध्ये तालुक्यातील ४ ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या. त्या ठिकाणी नवीन एकही ग्रामसेवक तालुक्यात रूजू झाला नाही. त्यामुळे ५७ ग्रामपंचायतींचा कारभार अल्प ग्रामसेवकांत हाकलणे सुरू आहे. बोरी ग्रामपंचायतीमध्ये तीन गावांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका जूनमध्ये रजेवर गेल्या. त्या पुन्हा परत आल्याच नाही. नंतर जुलैमध्ये त्यांची बदली घाटंजी पंचायत समितीत झाली. आजतागायत त्यांचा प्रभार कोणाकडे सोपविला हे सरपंच, उपसरपंच यांना माहीत नाही. यासंदर्भात पंचायत समितीकडे विचारणा केल्यास ग्रामसेवकच नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतची सर्व कामे ठप्प झाली आहेत. पोळा सण काही दिवसांवर आला असताना गावातील सार्वजनिक पथदिवे बंद आहेत. साथीचे ताप सुरू आहे. पाण्यात ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही. पदाधिकारी निवडीपासून ग्रामपंचायतीची एकही आमसभा झाली नाही. मासिक सभा नाही, नागरिकांना व विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळत नाही. त्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सरपंच सविता चिकराम व उपसरपंच सुधाकर खिरटकर यांनी केली. याबाबत गटविकास अधिकारी संजय वानखेडे यांना विचारणा केली असता, तालुक्यात ग्रामसेवकांची कमतरता असल्याने ग्रामसेवक येण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. तालुक्यातील ४ ग्रामसेवक बदलून गेले, त्याजागी नव्याने कोणीही आले नाही. त्यामुळे एकाच ग्रामसेवकाकडे दोन, तीन ग्रामपंचायतींचा प्रभार असून, बोरी ग्रामपंचायतीचा प्रभार लवकरच देणार असल्याचे सांगितले.
बोरी गावाला तीन महिन्यांपासून ग्रामसेवकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 4:46 AM