लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अनेक मुहूर्त टळल्यानंतर यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शाश्वती वाटत असल्याने कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लाऊन घेण्यासाठी जिल्ह्यातील दोनही राज्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. दोनही मंत्र्यांनी आपले ‘प्लस पॉर्इंट’ श्रेष्ठींपुढे मांडले आहे.राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील भाजप-शिवसेना युती सरकारला साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराचे अनेक मुहूर्त टळले. परंतु यावेळी मंत्रिमंडळाच्या स्पर्धेतील इच्छुक काही चेहऱ्यांची आधीच मंडळ-महामंडळांवर वर्णी लाऊन अडथळा दूर केला गेल्याने यावेळी विस्तार होणारच असे मानले जात आहे. या हमीमुळेच जिल्ह्यातील ऊर्जा राज्यमंत्री तथा पालकमंत्री मदन येरावार आणि महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड यांनी अनुक्रमे भाजपा व शिवसेना या आपल्या पक्षांकडून कॅबिनेट मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी त्यांचे समर्थक त्यांच्या जमेच्या बाजूवर चर्चा करताना दिसत आहे.दोनही राज्यमंत्र्यांना यावेळी कॅबिनेट मिळणारच असा विश्वास आहे. त्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्नही चालविले आहे. शिवसेनेत विदर्भातून एकमेव मंत्री ही संजय राठोड यांची सर्वात जमेची बाजू मानली जाते. कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यास विदर्भात पक्षवाढीसाठी मोठी मदत होईल असा दावा राठोडांकडून केला जात आहे. शिवसेनेने विधान परिषदेचे तिकीट कापल्याने डॉ. दीपक सावंत यांचे सार्वजनिक आरोग्यमंत्री पद जणू रिकामे झाले आहे. या पदावरच ना. संजय राठोड यांचा डोळा असल्याचे सांगितले जाते. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्षानुवर्षांपासूनचा त्यांना रुग्णसेवेचा अनुभव आहे. दरवर्षी आरोग्य महाशिबिरही ते घेतात. याच अनुभवाच्या बळावर आरोग्यमंत्री पद मिळवून ही रुग्णसेवा राज्यभर आणखी चांगल्या पद्धतीने राबविण्याचा त्यांचा मानस आहे.मदन येरावार यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून अनेक महत्त्वाचे खाते आहेत. कॅबिनेटपदी वर्णी लागल्यास यातीलच अन्न व औषधी प्रशासन आणि पर्यटन या दोन खात्यांना ना. येरावार यांची अधिक पसंती राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जाते. मुळात नगरविकास खात्यासाठीही ते आग्रही आहेत. परंतु हे खाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी या खात्याची आशा सोडली आहे.डी.फार्म.चे शिक्षण झालेले असल्याने अन्न व औषधी प्रशासन खात्याला आपण कॅबिनेट मिळाल्यास आणखी चांगला न्याय देऊ असा विश्वास ते समर्थकांमध्ये बोलून दाखवित असल्याचे सांगण्यात येते. अपारंपारिक ऊर्जा हे खाते वेगळे झाल्यास त्यालाही ना. येरावारांची पसंती राहू शकते. मुळात येरावार यांना यापूर्वीच कॅबिनेटची अपेक्षा होती. मात्र शपथविधी सोहळ्यात मागच्या रांगेत बसण्याची (राज्यमंत्र्यांच्या रांगेत) सूचना प्राप्त होताच त्यांचा त्यावेळी काहिसा हिरमोड झाला होता. मात्र आगामी विस्तारात त्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनामुळे कृषिमंत्री पद रिक्त झाले आहे. सध्या या पदाचा अतिरिक्त प्रभार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे आहे. मात्र माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी ‘दादांना विदर्भातल्या शेतीचे काय समजते’ असा आक्षेप घेतल्याने कृषिमंत्री पद पुन्हा विदर्भात दिले जाण्याची शक्यता आहे. हे पद भाजपाकडे असल्याने एखादवेळी मदन येरावारांचाही या पदासाठी विचार होऊ शकतो, असे भाजपातून सांगितले जाते.
कॅबिनेटसाठी दोन्ही राज्यमंत्र्यांची फिल्डिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 9:46 PM
अनेक मुहूर्त टळल्यानंतर यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शाश्वती वाटत असल्याने कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लाऊन घेण्यासाठी जिल्ह्यातील दोनही राज्यमंत्र्यांनी आपल्या राजकीय गॉडफादरमार्फत जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे.
ठळक मुद्देप्रतीक्षा विस्ताराची : येरावारांची एफडीएवर, तर राठोडांची आरोग्यवर नजर